विवेकानंद
गोव्याला येण्यामागे स्वामीजींच्या डोळ्यासमोर दोन प्रमुख उद्देश्य होते. पहिला देवदर्शन ! दक्षिण काशीतल्या देवतांचे दर्शन ! आणि दुसरा ख्रिश्चन मताचा अभ्यास! स्वामीजींचा मुक्काम बेळगावला होता.बेळगावचे सुप्रसिद्ध डॉक्टर श्री. विष्णुपंत शिरगावकर यांच्याशी त्यांचा परिचय झाला. बोलता बोलता गोव्याचा विषय निघाला. स्वामीजींच्या मनात गोव्याला जायचा विचार आहे हे विष्णुपन्तांच्यालक्षात आले.स्वामीजींच्या प्रवासाची व्यवस्था करायचे त्यांनी ठरविले. मडगाव शहरामधील विद्वान सद्गृहस्थ श्री. सुब्राय नायक यांच्याशी त्यांचा परिचय होता. विष्णूपंतानी सुब्राय नायकांना पत्र पाठविले. स्वामीजींचा परिचय व उद्देश्य लिहून त्यांची राहण्याची व्यवस्था करण्याची विनंती केली. विविध विषयांचे सखोल ज्ञान, समाजसेवेची तळमळ व उदीयमान पत्रकारिता यांचा व्यासंग अशा बहुश्रुत सुब्रायजीनी त्यांची विनंती सहर्ष स्वीकार केली.
श्री. सुब्राय नायकांचे घराणे हे मडगावातील प्रमुख प्रतिष्ठित घराणे. पोर्तुगीज अत्याचार, बाटवा बाटवी, द्वेषमूलक कायदेकानून यांच्यातून मार्ग काढीत स्वधर्म रक्षण करणारे. गोव्यात हिंदू धर्मावरील पहिला पोर्तुगीज आघात सासष्टी तालुक्यात झाला होता. रायतुरचा किल्लेदार दियोगु रुद्रीगीश याने साडेतीनशे देवळांचा विध्वंस केला होता.मडगांव शहरात धार्मिक स्थळाची उणीव भासू लागली. साहजिकच धर्मप्रेमी नायक कुटुंबीयांनी मडगावचे ग्राम दैवत श्रीदामोदार यांच्या पूजा अर्चेसाठी आपल्या घरातील एक मोठी खोली आज ज्याला साल म्हणतात, ते हिंदुना उपलब्ध करून दिले. धार्मिक विधींना सुरुवात झाली. आजही श्रीदामोदाराची नित्यपूजा तेथे मोठ्या भक्तिभावाने केली जाते.
२७ ओक्टोबर १८९२ ! मडगावचे रेल्वे स्टेशन ! शेकडो लोकांचा जमाव तेथे जमला होता. आतुरतेने स्वामीजींची वाट पहात उभा होता. मडगांव मधील प्रतिष्ठित नागरिकांसमवेत श्री सुब्राय नायक स्वामीजींच्या स्वागताला स्वतः उपस्थित होते. रेल्वेचे आगमन झाले. स्वामीजी खाली उतरले. काषाय वस्त्रधारी ते तेजः पुंज धिप्पाड व्यक्तिमत्व, चेहऱ्यावर विद्वत्तेचे तेज, धृढनिश्चयी मुद्रा, परतत्वाचा वेध घेणारी नजर ! ते आले त्यांनी पाहिले आणी त्यांनी जिंकले हे वेगळे सांगायला हवेय ?
श्री सुब्राय नायक यांनी स्वामीजींना आपल्या घोडा गाडीत बसविले. मोठ्या सन्मानाने मिरवणुकीने आपल्या घरी नेले. कोंब वाड्यावरील आपल्या पिढीजात घरात त्यांनी स्वामीजींच्या राहण्याची व्यवस्था केली. सालाशेजारची खोली त्यांना देण्यात आली आणि स्वतः जातीने त्यांची सोय सुविधा ते बघू लागले.स्वामीजींची ध्यान धारणा, चिंतन, देवदर्शन, भेटीगाठी यांची व्यवस्था करू लागले. प्रतिष्ठित लोक भेटायला येत. चर्चा करीत. भारावल्या स्थितीत पूर्ण संतुष्ट होऊन घरी जात. धर्म, मीमांसा, षड्दर्शने, लेखन, समाजसेवा विषयांची समा जुळल्याने श्रोत्यांच्या दृष्टीने ' सोनियांचे दिनु बरसे अमृताचे घनु ' ठरल्यास नवल ते काय!
देवदर्शनासाठी स्वामीजी फोंड्याला गेले. कवळेला श्रीशान्तादुर्गेचे दर्शन त्यांनी घेतले. गोव्याच्या मातीला संगीताचा वास आहे. साहजिकच इथे येणाऱ्याचा श्वास लयकारणारच ! सहजपणे स्वामीजी देवळात मांडी घालून बसले. जगदम्बेशी तद्रूप झाले. त्यांना दुर्गा आठवली. विश्वजननी कालीमातेचे भजन ते गावू लागले. देवळात देवदर्शनाला आलेली भक्त मंडळी सावरून बसली. स्वामीजींच्या मधुर आणि पहाडी आवाजाने ती मंत्रमुग्ध झाली. क्षणकाल का होईना आपल्या आराध्याला, शांतादुर्गा देवतेला मूळ कालीरुपात अनुभवू लागली.स्वामीजी मंगेशीला गेले. फोंड्याचा सगळाच भाग नितांत सुंदर. हिरवीगार शेते, पाचविचार कुळागरे! आणि त्याच्या साथीला त्या हिरवाईत, पाचुई कोंदणात वसवलेली देवालये. स्वामीजींनी श्रीमंगेशा समोर धृपद गायला. आपल्या मधुर रागदारीने उपस्थिताना तृप्त केले. जवळचे गावम्हाड्डोळ ! श्रीम्हालसा देवीचे स्वामीजींनी दर्शन घेतले. देवीसमोर त्यांनी एक सुंदर ख्याल गायला.
ते मडगावी परतले. सालातही त्यांनी श्रीदामोदारासमोर एक चीज आळवली. तब्बल पाऊण तास ते ती चीज विविध रागातून गात होते. गोव्यातील संगीत दर्दिना आश्चर्यचकीत करीत होते.
पर्वतावर याच काळात लयसूर्याचा उदय होत होता. खाप्रुमाम पर्वतकर ! वादनातील एक अनोखा चमत्कार ! एका पायाने त्रिताल, दुसऱ्या पायाने झपताल, एका हाताने लय, दुसऱ्या हाताने चौताल
धरून तोंडाने सवारी म्हणत एकाच वेळी समेवर येणारा हा लयभास्कर . सुब्रायबाबानी खाप्रूमामांना बोलवून आणले. स्वामिजीसमोर त्यांचे वादन झाले. तरुण खाप्रूला वादनासंबंधी सांगताना स्वामीजी म्हणाले, ' लाकडी खोक्याच्या कडेवर बोटांनी वाजवत जसा आपण आवाज काढतो, तसा आवाज चामड्याच्या वरच्या थरातून काढला आला पाहिजे. ' खाप्रूला हे पटेना. त्याला वाटले स्वामीजी आपली थट्टा करतात. हलकेच तसे ते म्हणालेही. स्वामीजी आसनावरून उतरले. बैठक मारून त्यांनी तबल्यावरून हात फिरविला. त्यांची बोटे तबल्यावरून फिरू लागली. दैवी आवाज सालात घुमू लागला. आपल्या वादनाने उपस्थितांना आ वासायला लावणाऱ्या कलावंत खाप्रूचा वासलेला आ पहाण्याचे भाग्य आज सर्वाना मिळाले होते. स्वामीजीच्या वादन कौशल्याने सगळेजण थक्क झाले होते. खाप्रू मामानी स्वामीजींना साष्टांग नमस्कार घातला. त्यांची क्षमा मागितली. आपल्या उमेदीच्या, उभारीच्या अत्यंत तरुण वयात स्वामीजीशी संबंध येण्याचे भाग्य खाप्रू मामांना लाभले.
हिंदुत्व हा मानवी जीवनाचा प्राण ! मानवी जातीला मार्ग दाखविणारा पथ परीचायक दीपस्तंभ ! शतकानुशतके अनथक चालत आलेला. हल्लीच्या काळातील काही दुराग्रही पंथांनी त्याच्यावर आघात करायला सुरुवात केली होती. माझे मत खरे आहे, असे म्हणायला हरकत नाही. पण दुसरी मते, अन्य विचार खोटे आहेत असे प्रतिपादन केले जात होते. फेनेटिक उन्माद पद्धतशीररित्या पसरविला जात होता. याचाच एक शीर्ष बिंदू म्हणून शिकागो येथे सर्वधर्म सभेचे आयोजन करण्यात आले होते. ख्रिश्चन मत जगावर लादण्याच्या योजनेचाच तो एक भाग होता.खंडन-मंडण यांची फार मोठी परंपरा लाभलेल्या या देशात परमताचा विचार, अभ्यास सहज केला जातो.स्वामीजी हाच प्रमुख उद्देश्य घेऊन गोव्यात आले होते. श्री. सुब्रायबाबाशी आपला मानस त्यांनी व्यक्त केला. मडगाव पासून ७ किमी. अंतरावर असलेल्या प्राचीन रायतूर किल्ल्याचे रुपांतर पोर्तुगीजांनी सेमिनारीत केले होते. ख्रिश्चन मतप्रसार करणारे पंथप्रसारक, पाद्री तेथे तयार केले जातात. तिथल्या ग्रंथालयात ख्रिस्ती पंथविषयक अनेक उत्तमोत्तम पुस्तके होती . अत्यंत दुर्लभ अशी प्राचीन हस्तलिखिते होती. लेटीन ग्रंथ होते. या पुरातन ग्रंथांमधून ख्रिश्चन पंथाचा इतिहास व तत्वज्ञान यांचा अभ्यास करणे. गोव्यातील समाजमनावर झालेला धर्मपरिवर्तनाचा प्रभाव जाणून घेणे. आणि सात किलोमिटरवर जावून मिळविलेल्या माहितीच्या आधारे सात समुद्रापलीकडे जाऊन अर्वाचीन हिदुत्वाची आश्वासक सिंहगर्जना करणे.
मडगावचे सुप्रसिद्ध वकील श्री. जुझे फिलीप आल्वारीस यांना सुब्रायबाबानी आपल्या घरी बोलाविले. स्वामीजींचा परिचय करून दिला. त्यांचा मानसही बोलून दाखविला. स्वामिजींशी झालेल्या अल्पशा भेटीत, त्यांच्याशी झालेल्या चर्चेत श्री. आल्वारीस अत्यंत प्रभावित झाले होते. त्यांनी ताबडतोप सेमिनारीतील आपल्या एका प्रोफेसर मित्राची भेट घेतली. स्वामी विवेकानंदांची रायतुरच्या सेमिनारीत दोन दिवस राहण्याची सोय केली. ग्रंथालायातले प्राचीन ग्रंथ दाखविण्याची व्यवस्था केली.
स्वामीजी रायतूरला गेले. तिथल्या प्राचीन ग्रंथांचे ते अध्ययन करू लागले. हस्तलिखिते चाळू लागले. काही टिपणेही त्यांनी काढली. तेथील विद्यार्थी, शिक्षक, पादरी, त्यांचे प्रमुख स्वामीजींना कुतुहलाने बघत. फुरसतीच्या वेळी त्यांच्याबरोबर वार्तालाप करीत. विविध प्रश्न विचारीत. स्वामीजीची वेशभूषा, प्रगाढ ज्ञान, तीव्र स्मरणशक्ती, चौफेर व्यासंग यामुळे लोखंडाने चुंबकाला चिकटावे तसे सर्वजण आकर्षिले जात. शेकडो विद्यार्थी तिथे निवासाला असत. येशूच्या धर्माचे सार त्यांनी या विद्यार्थ्यासमोर ठेवले. एक भगवा संन्यासी येतो काय ! चारदोन पुस्तके चाळतो काय ! आणि वर्षानुवर्षे पंथ कोळून प्यालेल्याना त्यांच्याच पंथाचे मर्म सांगतो काय ! सगळेच स्तंभित करणारे.
साहजिकच श्री. सुब्राय नायकांच्या घरी विद्वानांचा ओघ सुरु झाला. ख्रिश्चन मंडळीही बरीच येऊ लागली. प्रतिष्ठित वकील,, बेरिस्टेर, जज, नायकांकडे येत. दूरदुरून पादरी मंडळीही येई. स्वामिजीकडे मनमोकळेपणाने संवाद करीत. लेटीन, इंग्रजी, फ्रेंच अशा विविध भाषात हा संवाद चाले. स्वामीजीची उत्तर देण्याची पद्धती त्यांना भावे. ते तिचे कौतुक करीत. सगळ्या धर्मांचे सखोल अध्ययन केलेला, बहुश्रुत, मेधावी असूनही अत्यंत साधा असा हिंदू संन्यासी त्यांनी पहिल्यांदाच पहिला होता.बघता बघता पंधरवडा उलटला. स्वामीजींची पुढच्या प्रवासाची वेळ जवळ आली. श्री. सुब्राय नायकांनी स्वामीजींच्या गौरवपर एका सभेचे आयोजन श्रीदामोदराच्या पटांगणात केले. उपस्थित वक्त्यांनी विवेकानंदांचे गुणवर्णन केले. त्यांच्या नियोजित कार्यात,सर्वधर्मपरिषदेत त्यांना यश प्राप्त होवो अशी कामना व्यक्त केली. बरीच पादरी मंडळीही या सभेस हजर होती.
श्री. हरिपद मित्र यांना पाठविलेल्या पत्रांत स्वामीजी लिहितात, '' मी येथे सुखरूप येऊन पोहोचलो.येथे मी पणजी शहर पाहिले, तसेच काही खेडीही पाहिली. जवळपास असलेली काही देवळेही पाहिली. तिकडून मी आजच परतलो. गोकर्ण- महाबळेश्वर आदि स्थानांना भेट देण्याचा माझा मानस मी अद्याप सोडून दिलेला नाही. उद्या सकाळच्या गाडीने मी धारवाडला जाण्यासाठी निघेन.... पणजी हे टुमदार आणि मोठे स्वच्छ शहर आहे. येथील बहुतेक ख्रिस्ती लोक साक्षर आहेत. प्रायः सर्व हिंदू अशिक्षित आहेत. ''
श्री सुब्राय नायकांनी स्वामीजी कडे त्यांचे एक छायाचित्र मागून घेतले. आजही सालामध्ये त्याचे परिवर्धीत रूप आपल्याला पहायला मिळते. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात स्वामीजी धारवाडला जायला निघाले. रेल्वे स्टेशनवर त्यांना निरोप द्यायला हिंदू तसेच ख्रिश्चन समाजातील प्रतिष्ठित लोक शेकडो नागरिकांसह आले होते. रेल्वे दिसेनाशी होईपर्यंत साश्रू नयनांनी हात हलवत निरोप देत होते.