Wednesday, March 12, 2014

११८ धुंदी कळ्यांना , धुंदी फुलांना !

                              ११८  धुंदी कळ्यांना , धुंदी फुलांना !

नाही ! पण आज भामेने भांडायचे ठरवलेच होते . भामाच ती ठरविले म्हणजे ठरविले . अर्धा दिवस तरी वाया जाणे आता निश्चित . चल लेका लग्न केलेय ना भोग आता ह्या भांडणाचा योग . 
     नारदमुनींनाही बरोब्बर दिसला तो पारिजात . झाड आणि पडलेली फुलेही . काय आवश्यकता होती सत्यभामेला सांगायची की, पारिजात फुले रुक्मीणीला देतो म्हणून ! चोवीस तास नाकाच्या शेंड्यावरच्या लवेच्या टोकावरती सवतीमत्सर बाळगणारी ती . गप्प थोडीच राहील ? 
     असू दे.  केव्हा ना केव्हा तरी हा प्रसंग येणार होताच . आता आला . बस लेका आता तो सोडवत . 
     देवांनी किती प्रेमाने हा स्वर्गीय वृक्ष मला दिला . घरी आल्यावर लक्षात आले . देवांना विजय मिळवून दिल्यावर स्वर्गातील युद्ध संपले . माझ्या घरातील महायुद्धाची नांदी करीत . करणार काय ? काढली युक्ती ! पारिजातक लावला सत्यभामेच्या अंगणात ! भामा खुष ! प्रेम चिंब चिंब भिजलेले ! दवबिंदी हिरवळीवर पदरव उमटावा ना अगदी तसाच ! पारिजातकी ! कधी संपूच नये असे वाटणारे !
     पिसासारखा हवेवर तरंगत तरंगत गेलो रुक्मिकडे ! बघतो तर ती फुरगटून बसलेली . हा हा हा ! जरा बाहेर ये अंगणात आणि मग रुस सखे . अग ये तर खरी ! रुक्मिणी आपल्या अंगणात आली आणि बघते तर काय ! पारिजात !  पारिजात ! आणि पारिजात ! स्वर्गीय पुष्पांनी अंगण भरून गेलेले . धुंद करणारा तो ईश्वरी परिमल आणि तसाच धुंद पारीजाती परिसर . धुंदी कळ्यांना , धुंदी फुलांना !!!!!