Sunday, May 11, 2014

१२० पारीजातालाही दुखते तर !

                       
                 १२०  पारीजातालाही दुखते तर !

     श्रावणी आदितवार . आज आई रविवार पूजणार . फुले सगळ्या तरेची लागणार . पारिजात मात्र हवाच . तोच प्रमुख ना . पारिजात भरपूर जमवायचा आज . 
     घराला स्पर्शून पारिजात उभा . अर्धी फुले घरावर व अर्धी जमिनीवर पखरणारा . त्याचा आजचा सडा काही औरच होता . शुभ्र धवल पाकळ्या मधून रेखलेली देठांची ती भगवी नक्षी सादोळशेच्या त्या भगव्या मातीशी स्पर्धा करणारी . 
     एक पारजत उचलला . त्याला मातीचे कण लागलेले . पहाटे कधीतरी पावसाचा शिडकावा आलेला दिसतोय . चला आता नेहमीप्रमाणे घरावर . चढलो झाडावर . बुळबुळीत झालेल्या कौलांवर पाय टेकला . एक हात फांदीला आणि एक हात पारिजात वेचायला . 
     फुलामागून फूल . परडी भरू लागली . आणखी हवा पारिजात . पन्हळावर जायचे . कमी बुळबुळीत तो . हळुवारपणे हात सोडला फांदीचा . पाय ठेवला पन्हळावर . हा आता बिनधास्त . एका हातात परडी आणि दुसऱ्या हाताने वेचणी . 
     झाले  आता आणखी एकच फूल टाकायचे . आणि आणि सुळूक धाड ! हात झटकत उभे राहताना जाणवले . दाणकन आपटलोय जमिनीला . हातातल्या परडीसकट ! 
     चंद्रशेखर गोखलेची ' असा मी ' मधील चारोळी आठवली . 

झाडावरून प्राजक्त ओघळतो 
त्याचा आवाज होत नाही . 
याचा अर्थ असा नाही की 
त्याला इजा होत नाही . 

Friday, May 2, 2014

११९ नेम चुकला नसता तर !

                                    ११९ नेम चुकला नसता तर !

  ' लहानपण देगा देवा , मुंगी साखरेचा रवा ' असे मोठी माणसे खुशाल म्हणोत . पण लहान मुलांना मात्र नेहमी लवकर मोठे व्हायचे असते . याचे एक प्रमुख कारण म्हणजे नियम . ' असे करा , तसे करू नका ' म्हणत मोठ्यांनी लादलेले अनंत अविरत नियम . अक्षरशः कंटाळा यावा इतके तयार तत्पर नियम . 
     शस्त्र माणसावर रोखू नये हा असाच एक नियम . साधी सुरी जरी समोरच्यावर उचलली तर ती आधी जमिनीला लावली पाहिजे . मगच तिचा वापर करायचा . जोपर्यंत शस्त्राचा जमिनस्पर्श तोपर्यंत त्याचा वापर नाही . आणि लहानपण हे, हे नियम काटेकोरपणे पाळण्याचे . 
     स्वातंत्य्रापूर्वीचा काळ . शस्त्रांचे प्रचंड आकर्षण . सगळे जमले होते . रायफली बघत होते, हाताळत होते . एकाने रायफल उचलली . नेम धरत डॉक्टर हेडगेवारांवर रोखली . डॉक्टर म्हणाले, ' अरे शस्त्र असे माणसावर नाही रोखायचे . रिकामे असले तरीही . बाजूला कर ते ! ' 
     मित्रमंडळीत ऐकायचे थोडेच असते ! त्या माणसाने चाप ओढला . ' ठो ' आवाज झाला आणि गोळी उडाली . डॉक्टरांच्या कानाजवळून गेली होती ती . त्या भरलेल्या बंदुकीचा नेम चुकला नसता तर !!!!!