Thursday, September 25, 2014

१२४ तीच संशोधने यशस्वीही होतात


                               १२४  तीच संशोधने यशस्वीही होतात

     भारतीय मंगलयान मंगल गहाच्या कक्षेत यशस्वीपणे स्थापन केल्याबद्धल इस्रो या भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे अभिननदन . आपल्या पहिल्याच प्रयत्नात आणि कमी खर्चात यशस्वी झाल्यामुळे तर उत्तुंग  गौरवप्राप्त झालेत . संपूर्ण देश आज त्यांना आदरपूर्वक प्रणाम करीत आहे . शाबास पठ्ठे  !
    चांगल्याला थोडेसे गालबोटही हवे . त्याप्रमाणे मोदी , मंगळ व सरती अमावास्या यावरून काहींना मळमळले . काहीजणांनी सोशल मिडीयावरती उलटी करून आपल्या कोत्या मनोवृत्तीचे ओंगळ प्रदर्शनही घडविले  . अनाडी लोकांच्या या आदळआपटीकडे  कानाडोळा करणेच योग्य होईल .
     लखनौ विश्वविद्यालय . ज्येष्ठ भारतीय शास्त्रज्ञ बिरबल सहानी तेथे काम करीत होते . शास्त्रज्ञांचे एक विदेशी शिष्टमंडळ त्यांना भेटायला येणार होते .
     बिरबल सहानी पडले संशोधक . साहजिक ते आपल्या संशोधनात मग्न होते . कामाच्या व्यस्ततेत वेळ कधी कसा निघून गेला काही कळलेच नाही . ते विदेशी शिष्टमंडळ सरळ सहानीच्या प्रयोगशाळेत येउन दाखल झाले .
    एका छोट्याश्या अडगळीच्या खोलीच्या कोपऱ्यात सहानी काम करीत होते . त्या महान  भारतीय शास्त्रज्ञाकडे आणि त्यांच्या त्या लडखडणाऱ्या टेबलाकडे पहात ते विदेशी शास्त्रज्ञ उद्गारले, " ही तुमची प्रयोगशाळा ? '
     " माझ्या देशाला एवढेच परवडते ."  बिरबल सहानी म्हणाले . पुढे म्हणाले, " संशोधने अशाच ठिकाणी होतात . आणि तीच यशस्वीही होतात . "