१४३ देव त्या माहुतातही
एकदा रामकृष्ण परमहंस आपल्या शिष्यांना ' सर्व चराचर सृष्टीमध्ये त्या सर्वशक्तिमान परमेश्वराचा वास असतो ' हा विषय समजावून सांगत होते.
नवीनच आलेल्या एका शिष्याने स्वामी रामकृष्ण यांना प्रश्न केला, " माणसांमध्ये जसा जीव असतो तसाच प्राणीमात्रात असतो काय ? "
रामकृष्णानी ' होय ''असे उत्तर दिले.
एके दिवशी रामकृष्ण त्या शिष्या समवेत रस्त्याने चालले होते. अकस्मात समोरून एक पिसाळलेला हत्ती येऊ लागला. हत्तीवरील माहूत ओरडत होता. ' हत्ती पिसाळलाय. बाजूला व्हा ! बाजूला व्हा ! '
रामकृष्ण विनाविलंब बाजूला झाले. शिष्य मात्र आहे तिथे रस्त्याच्या मधोमधच उभा राहिला. तो विचार करीत होता. जो जीव माझ्यात आहे, तो या हत्तीतही आहेच ना !
इतक्यात हत्ती जवळ पोहोचला. हत्तीने त्याला आपल्या सोंडेत पकडले आणि दूरवर भिरकावून दिले. सुदैवाने तो मातीत पडला. परंतु उंचावरून पडल्याने त्याचे अंग चांगलेच सडकून निघाले.
स्वामीजी जवळ आल्यावर त्यांच्याकडे रागाने बघत शिष्य उद्गारला, " हाच ना तुमचा परमेश्वर, जो हत्तीत आहे ? "
शिष्याला आपादमस्तक न्याहाळत मिश्किलपणे रामाकृष्ण म्हणाले, " तो परमेश्वर त्या माहुतातही आहे. तू नाही ऐकलेस त्याचे ! "