Monday, October 28, 2019

१४० ढाक्याची मलमल

                            १४० ढाक्याची मलमल 

     औरंगजेब आपल्या दरबारात बसलेला होता . भेटी नजराणे देण्याची वेळ . एक विणकर पुढे आला . कुर्निसात केला आणि भेटीची छोटीशी डबी त्याने समोर धरली .  राजाने डबी उघडली . पांढरे शुभ्र तलम रेशमी वस्त्र बाहेर येऊ लागले . ' इन्शाल्ला ! ' बादशहा नकळत ओरडला . डोळ्यांचे पारणे फेडणारा तो कलाकुसरीचा अप्रतिम नमुना !
     औरंगजेबाने ते वस्त्र त्याची लाडकी मुलगी झेबुन्निसाला दिले . तारुण्यसुलभ उत्सुकतेने झेबुन्निसा ते वस्त्र घेऊन पळाली. तिच्या मागे दासीही पळाल्या .  ते वस्त्र, ढाक्याची ती प्रसिद्ध मलमल त्यांनी तिला नेसविली . दर्पणापुढे उभी केली आणि …. 
     झेबुन्निसाचे सौंदर्य त्या वस्त्रातून उठून दिसत होते .  जणू त्या वस्त्राचे अस्तित्वच  नाकारत होते . ती लाजली . लटक्या रागाने दासींना मारायला धावली . दासी पळाल्या .  दर्पण, झेबुन्निसाला तिचे सौंदर्य दाखवत होता . डोळ्यातून टपकणारा प्रत्येक कुतूहलाश्रू तिला  अधिकाधिक पारदर्शी करत होता . त्या आरस्पानी सौंदर्याला तीन चांद अधिक लावत होता . 


Sunday, October 27, 2019

१३९ गुरुपौर्णिमा

१३९ गुरुपौर्णिमा 

     अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन आणि माझ्या प्रिय बंधू भगिनीनो .  आज गुरुपौर्णिमा  . त्यानिमित्ताने मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावेत अशी माझी नम्र विनंती . 
     गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या भारतात प्राचीन काळापासून साजरा होत आला आहे . गुरु म्हणजे आपल्याला ज्ञान देणारा,  शिकविणारा . त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणारा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा . 
     जगाचा आद्य गुरु म्हणजे भगवान वेद व्यास . व्यासांनी ज्ञानाचे भांडार जगाला खुले केले . त्यांनी त्यासाठी अखंड प्रवास केला, खूप कष्ट सहन केले, प्रचंड माहिती जमविली . चार वेद, अठरा पुराणे, महाभारत आणि भागवत एवढे मोठे साहित्य भांडार व्यासांनी आमच्यासाठी दिले . म्हणून म्हणतात ' व्यासोच्छिष्ठं जगत् सर्वम् ' आज त्यांचे स्मरण करण्याचा दिवस . 
     गुरु म्हणजे आपल्याला दिशा दाखविणारा . चांगल्या वाटेने नेणारा . आपल्या संस्कृतीत यांची अनेक उदाहरणे आहेत . ऋषी विश्वामित्र आणि राजा राम, गुरु सांदिपनी आणि शिष्य कृष्ण, समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी, रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद, आमच्या देशातील गुरुशिष्य परंपरेला या माणसांनी महान बनविले आहे .
     संध्याकाळची वेळ होती . खूप पाऊस पडत होता .  नदीचे पाणी वाढायला लागले. हळूहळू ते बांधाला, त्याच्या वरच्या टोकाला टेकले . बांध ओलांडून ते शेतात यायला लागले .  आरुणी विचार करू लागला . बांध फुटला तर पाणी शेतात घुसेल . सगळे शेत वाहून जाईल . मग आपण खाणार काय ? आता काय करावे बरे ? त्याने बांधावर माती घालयला सुरुवात केली . पण वेगाने वाहणारे पाणी त्या मातीने थोडेच थांबेल ? घातलेली माती वाहून जाऊ लागली . आरुणीने क्षणभर विचार केला आणि त्या बांधावर स्वतः ला झोकून दिले .