Friday, September 20, 2013

११५.सोवळे फाटले होते .

                       कथा विवेकानंद - ११५

     वडिलांच्या देहावसानानंतर नरेंद्रच्या घरची परिस्थिती बिकट झाली . खायची जेवायचीच मारामार . मग कपडेलत्ते आणि कुठे ? भुवनेश्वरीदेवी नित्य आन्हिक करीत . आन्हिक करताना नेसायचे सोवळे फाटले होते . 
     डोके दुखत असल्याने नरेंद्र कापराचे नस्य घेत होता . आई त्याला म्हणाल्या, ' बेटा नोरेन, एखादे वस्त्र आणता आले तर बघ ना ! माझे सोवळे पूर्ण फाटलेय आता . ' नवे कुठून आणणार ? नरेंद्राला वाईट वाटले . तो मान खाली घालून निघून गेला . 
     नरेंद्र आश्रमात आला होता . त्याच वेळी रामकृष्णांना एका भक्ताने रेशमी सोवळे भेट म्हणून दिले होते . नरेंद्र दिसताच त्यांनी ते सोवळे नरेंद्राला न्यायला सांगितले . पण नरेंद्रने ते घेतले नाही . 
     मग रामकृष्णांनी दुसऱ्याच शिष्यामार्फत ते सोवळे नरेंद्रच्या घरी पाठविले . 

Wednesday, September 18, 2013

११४. ते चोराला चोरी करायला सांगतात

                        कथा विवेकानंद - ११४

     स्वामी विवेकानंदांच्या आई भुवनेश्वरीदेवी स्वामी रामकृष्ण यांच्या आश्रमात आल्या . स्वामीजी तेव्हा आजारी होते . एका भल्या मोठ्या खोलीत मध्यभागी ठेवलेल्या बिछान्यात तक्त्याला टेकून ते बसले होते . 
     भुवनेश्वरीदेवी आल्या आल्याच स्वामीजींनी बोलायला सुरुवात केली . ते म्हणाले, ' खरे म्हणजे मला डॉक्टरांनी बोलायला बंदी केलेली आहे . तुमच्याशी तर महत्वाचे बोलायचेय ! मग बंदी पाळून काय उपयोग ? 
     गिरीश व इतरांनी नरेंद्राला संन्याशाची वस्त्रे घालायला लावली . मी त्यांना अडवले . पण ते ऐकायलाच तयार नाहीत . मी त्याला घरच्या स्थितीची जाणीव करून दिली . आई व लहान भावंडांच्या पालनपोषणा संबंधी सांगितले . कोणी ऐकायलाच तयार नाही . '
    घरी आल्यावर आईने नरेंद्राला स्वामीजींचे बोलणे सांगितले . नरेंद्र म्हणाला, 'ते चोराला चोरी करायला सांगतात आणि गृहस्थाला सावध रहायला सांगतात . ' 




Sunday, September 15, 2013

११३. संकट हातात हात घालून !

                    कथा विवेकानंद - ११३

     संकट हे नेहमीच दुसऱ्या संकटाच्या हातात हात घालून येत असते . एका परीने माणसाची परीक्षाच ती . नरेंद्र आर्थिक समस्येत बुडालेला . पदवी हातात . पण नोकरी नाही . त्या काळीही आजच्या सारखीच परिस्थिती . 
     चाम्पाताला येथे विद्यासागरांनी शाळा सुरु केली होती . त्या शाळेला मुख्याध्यापकाची आवश्यकता होती . महेंद्रनाथांच्या नजरेत नरेंद्र आला . त्यानी प्रयत्न केले आणि नरेंद्र मुख्याध्यापक म्हणून  तेथे काम करू लागला . 
     त्या शाळेचे सचिव होते विद्यासागरांचे जावई . नरेंद्र त्याच्या डोळ्यात खुपू लागला . त्यांनी पडद्यामागे हालचाली केल्या . नरेंद्राला राजीनामा द्यावा लागला . कारण होते, नववी व दहावी वर्गातील विद्यार्थ्यांनी संयुक्तपणे केलेला अर्ज . ' नवीन मुख्याध्यापकांना शिकविता येत नाही . ' 
    ज्या माणसाला सारे विश्व डोक्यावर घेऊन नाचले किंवा जो आज सुद्धा युथ आयकोन आहे त्याच्या बाबतीत घडविलेले एक कारस्थान . 


Saturday, September 14, 2013

११२. देवाचे नाव घेणे पुरे आता .

                      कथा विवेकानंद - ११२

     विवेकानंद देवभक्त होते . ते देवाची पूजा करीत . नेहमी देवाचे नाव त्यांच्या तोंडी असे . ते परमश्रद्ध होते . आस्तिक होते . 
     वडिलांचे देहावसान झाले . घरात पैशांची चणचण निर्माण झाली . उपाशीपोटी दिवस काढावे लागले . तरी देवावरची त्याची निष्ठा तिळभरही ढळली नाही . 
     सकाळी उठताना नरेंद्र परमेश्वराचे नामस्मरण करीतच उठे . ' विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्श्यं क्षमस्व मे ' हि आपली परंपराच नव्हे काय ? त्याचे प्रातः स्मरण सुरु होते . 
     स्वयंपाकघरातून आई एकदम ओरडली . ' गप्प बस बघू  . देवाचे नाव घेणे पुरे ते आता . लहानपणापासून एकाच मंत्र . देव देव आणि देव . काय दिले त्याने आम्हाला . हे भोगच ना ? '