१२३ हात उलटा, सायकल पलटा
हायर सेकंडरीतले दिवस . पाचसहा मित्र चालत चाललो होतो . गावगप्पा गोष्टीगजाली . हसत खिदळत कॉलेज जवळ करीत होतो . सकाळ असल्याने महामार्गावर वाहने कमी . एखाददुसरे रोरावत निघून जाई. त्याला वाट करून दिली की पुन्हा रस्ता व्यापायला आम्ही मोकळे .
' किण किण, किण किण ' मागून सायकलच्या घंटीचा आवाज . मागे वळलो तर सुरेश ! सुऱ्या ! आज सायकलवरून आला होता . शायनिंगचा मूड तर त्याचा अतिउत्साही चेहरा ओरडून ओरडून सांगत होता .
' मी हात उलटे धरून सायकल चालवितो . तुम्हाला कुणाला येते का ? बेट ( पैज ) मारायची का ? ' कोसळणाऱ्या धबधब्यावर पाणी ओतून काय फायदा !
' चला मीच चालून दाखवितो . हे बघा . '
सुऱ्याने हेन्डलवर डाव्या जागी उजवा व उजव्या जागी डावा हात पकडला . हातांची कातर केली . पायडल मारले आणि सायकल चालू झाली .
' जितं मया ' च्या आवेशात दोनचार मीटर गेला असेल नसेल ! अकस्मात समोरून एन. पी. ट्रकाने एन्ट्री घेतली . वाहन समोर आल्यावर आपण काय करतो ? सायकल डावीकडे वळविण्यासाठी डावा हात मागे करतो व त्याच बरोबर उजवा हात पुढे करतो . सुऱ्याने बरोब्बर तसेच केले . पण हाय रे कर्मा ! हात उलटे असल्याने सायकल उजवीकडे वळली . सुऱ्याच्या गोट्या मस्तकात !
हात उलटे असल्याचे लक्षात येताच सुऱ्याने वेळ नाही घालवला . झटक्यात उलटा व्यवहार केला . डावा हात पुढे घेतला . उजवा हात मागे घेतला . सर्वशक्तीनिशी पायडल दाबला आणि आणि …डावीकडील मीटर दीड मीटर खोलीच्या शेतामध्ये धाडदिशी पतन .
चौकोनी करंदीकरांच्या त्रिकोणी व्याकरणाला गोल करीत वर्गात अनुप्रास जुळला . ' सादोळशेच्या सुऱ्याने सोनी सायकलवरून सोमवारी सकाळी सुंदर सूर्याला सिर साष्टांग सूर्यनमस्कार घातला . ' अन वर्गात हास्याचा धबधबा फुटला . `