१२२ काणी खाणी कोतवा . . . .
संध्याकाळची वेळ . पाय मोकळे करण्यासाठी बाहेर पडलो .साहजिकच देवळाच्या दिशेने पावले वळाली . वाटेत मित्र दिसला आणि थबकलो .शिळोप्याच्या गप्पा रंगल्या .
मित्राचा निरोप घेणार इतक्यात कच्चदिशी रोधक लागले . गाडी उभी झाली .गावातील एक माणूस गाडीतून उतरत होता .विदेशी बनावटीची किमती गाडी . काळ्या रंगाच्या काचा. दिमाखदार आकार . हा माणूस खाण व्यवसायात उतरल्याचे कानावर आले होते .खोऱ्यानी पैसा ओढतोय असेही ऐकले होते . पण इतके ?
क्षणभर गतकाळात गेलो . रस्त्याच्या कडेला बसून आल्या गेल्याची टिंगल टवाळी करणारा हा .एखादी देणारा आणि चार खाणारा .शिक्षणाचा गंधही नाही .खिशात दमडी नाही . आणि आज कोठल्या कोठे !
" वळण घ्यायला आलो होतो . तुम्ही दिसलात आणि थांबलो . " तो उदगारला . दोन शब्द बोलून तो जायला निघाला . दूर संवेदीने त्याने दार उघडले . गाडीत बसला .आणि गरकन त्याने वळण घेतले . गाडी विदेशी होती पण रस्ता स्वदेशी होता .खाड्कन कडेच्या दगडाला त्याने गाडी ठोकरली .
माझ्या मनात विचार आला .आता तो खाली उतरणार .सरकारला, बांधकाम खात्याला शिव्या घालणार . पण कुठचे काय ? काहीही झाले नसल्याच्या अविर्भावात तो सुळकन निघून गेला होता . शर्टाच्या बाहीवर पडलेला मातीचा कण टिचकीने उडवावा तसा तो गाडीचा धक्का त्याने उडविला .
.मित्र म्हणत होता " या गाडीची किमत आहे ४८ लाख "
No comments:
Post a Comment