Friday, December 12, 2014

१३७ भ्रष्टाचाराचा कुजन्म झाला.

                                  १३७  भ्रष्टाचार 

     ऐका हो ऐका ! हि आहे भ्रष्टाचाराची कुळकथा . एक आटपाट नगर होते . दिल्ली त्याचे नाव . नुकताच तेथे राजाचा राज्याभिषेक झाला होता . मिठाई वाटली होती फटाके फोडले होते . नव्या नवलाईने सगळे न्हाऊन निघाले होते . राजाचे तर कोण कोडकौतुक ! गोरागोमटा, टोकदार नाकाचा , फाडफाड विन्गलीश बोलणारा , सुंदर गुलाबांशी खेळणारा . देश
नुकताच स्वतंत्र झालेला . सोनेरी भविष्याची भव्य स्वप्ने लोकांच्या डोळ्यात तरळत असलेली . 
     भारतीय संरक्षण दलासाठी तीन हजार जीप गाड्यांची आवश्यकता होती. कृष्ण मेनन तेव्हा लंडन मध्ये भारतीय उच्चायुक्त होते. अमेरिकेकडून एक हजार नवीन  जीपगाड्या खरेदी करण्यात आल्या.
इकडे कृष्ण मेननानी दोन हजार जीपगाड्या इंग्लंड कडून विकत घेतल्या. इंग्लंडने जुन्या जीपगाड्या त्यांत दुरुस्ती व रंगरंगोटी करून भारताच्या माथी नवीन म्हणून मारल्या. इंग्लंडच्या या जीप गाड्यांना अमेरिकेच्या जीप  इतकेच  पैसे द्यायला मेनन विसरले नाहीत. तत्कालीन प्रधानमंत्री पं. नेहरूंनी मेननला झाडायचे सोडून त्याच्या या कृष्णकृत्यावर  पांघरूण  घातले. सुरकुती पडू न देता पांघरूण घातले  आणि  स्वतंत्र  भारतात   भ्रष्टाचाराचा कुजन्म झाला.

१३६ प्रभातीचा दुर्गंध

                                    १३६   प्रभातीचा दुर्गंध 


अनेक लोक सिंगापूरला जातात.
गोव्यात आल्यावर तिथल्या स्वच्छतेवर ते  छान बोलतात.
कुठेही कागद - कपटा, पिंक नाही. प्लास्टिक पिशव्या-बाटल्या नाहीत.
तुम्ही शहाळे खा. करवंटी मात्र विशिष्ट जागीच  टाकली  पाहिजे.
अस्वच्छतेला शिक्षा आहेच, त्याचबरोबर लोकही नाक मुरडताना दिसतील.

शहरात राहणाऱ्या एका महाभागाची कथा बघा !
सकाळची प्रसन्न वेळ. शांत मंद वारा. तसाच प्रकाशही !
हा सभ्य गृहस्थ आपल्या कुत्र्याला फिरविण्यासाठी बाहेर पडला.
सांखळीत अडकवलेली  पांढऱ्या शुभ्र रंगाची विदेशी पामेरियन कुत्री.
रमत-गमत, दुसर्यांच्या गाडीच्या टायरावर मुत्रदान करीत मजेत चाललीय.

एक सुबकसे घर. घरासमोर सुंदर फुले फुललीत. सुवासही पसरलाय.
हे महाशय तिथे थाबलेत. घरमालकाच्या नकळत फुले काढताहेत.
साध्या, सरळ शब्दात सांगायचेय तर चोरताहेत. बरोबर ना ?
हे गृहस्थ फुले तोडताहेत म्हणजे घरमालकाचा परिमल, सुगंध नेताहेत.
आणि इकडे खाली जमिनीवर ती कुत्री एकाग्रचित्ते आपले प्रातर्विधी उरकते आहे.
थोड्याश्या अतिशयोक्त शब्दात म्हणजे घरमालकावर ह्गते आहे.

घरमालकाने दारी फुलझाडे  लावली, प्रभाती घरात सुगंध येतो ! 
फुलांच्या चोरीसमवेत हा महाभाग मालकाला दुर्गंध देतो.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे !!!!!

Sunday, December 7, 2014

१३५ मोठ्या प्रवासाला तो निघून गेलाय.

                            १३५  मोठ्या प्रवासाला तो निघून गेलाय.

संध्याकाळची वेळ !
नेहमीप्रमाणे सगळी मुले शिकवणुकीसाठी जमली होती.
आपापला दिलेला अभ्यास मन लावून  सगळी करीत होती.
गंगाधरशास्त्री मोठ्या लाकडी पेटीला टेकून बसले होते.
मुलांनी विचारलेल्या शंकांचे निरसन करीत होते.
मधून मधून आपले डोळे ते बंद करीत.

शिकवणी संपली. मुले गंगाधरशास्त्रीकडे मघापासून पाहत होती.
त्यांच्या बरोबर नेहमी अभ्यासाला बसणारा दुदिराज आज दिसत नव्हता.
मुलांनी गुरुजीना विचारले, ' दुदिराज कुठे गेलाय ?  '
गुरुजी गप्प बसले. त्यांनी डोळे मिटून घेतले.
मुलांनी पुन्हा विचारले.
गुरुजी म्हणाले, " माणसे जिथून परत येत नाहीत अशा मोठ्या
प्रवासाला तो निघून गेलाय.  आत्ताच त्याला पोहोचवून मी आलोय. "

स्तंभित झालेली ती मुले गुरुजीना म्हणाली.
' आणि  तुम्ही एक शब्दही न बोलता आमची शिकवणी घेतलीत ? '
गुरुजी म्हणाले, " बाळांनो तुम्ही किती दूरवरून चालत येता.
तुमचा आजचा दिवस वाया गेला असता ना ?
आणि हे दुःख आता मला नेहमीचेच आहे ना ? "

' शिष्येदिच्छा पराजयेत ' विद्यार्थ्यांना  आपल्यापेक्षा मोठा करणाऱ्या शिक्षकांना,
माझ्या सगळ्या ज्ञात अज्ञात शिक्षकांना माझा साष्टांग नमस्कार.

१३४ पाणी हे जीवन आहे

                                      १३४   पाणी हे जीवन आहे

आज जलसंपत्ती दिन आहे. जल म्हणजे जीवन.
माणसाच्या जीवनाशी निगडीत पंचमहाभूतांपैकी पहिले दैवत.
आप,पाणी,नीर,तोय,उदक जवळ जवळ ७० प्रतिशब्द संस्कृत मध्ये सापडतील.
एवढे महत्वाचे दैवत पाणी आहे. त्याचा जपून वापर केला पाहिजे.

पूर्वी सरकारने गावोगावी सार्वजनिक नळ बसविले होते.
प्रतिष्ठितानी त्यांना पाईप लावून कवाथे शिंपणे,गाड्या धुणे वगैरे उद्योग सुरु केले.
शेजारणीची लक्तरे सार्वजनिक नळावर धुताना,
कळशी भरून वाहतेय याचे भान महिलांनी कुठे ठेवले ?
परिणामी सरकारने कनेक्शन व भंगारवाल्यांनी नळ नेल्यावर,
कोन्क्रीटचे खांब तेवढे शिल्लक राहिले.

कॉंग्रेसचे अधिवेशन अलाहाबादला भरले होते.
दुपारचे जेवण झाले. गांधीजी हात धुवायला उठले.
मंडपाबाहेर पाण्याची बादली ठेवली होती.
नेहरूंनी गांधीजींच्या हातावर भस्स करून पाणी  ओतले.
गांधीजी म्हणाले, " पाणी जपून वापरावे. "

नेहरूंनी समोर बघितले. गंगा दुथडी भरून वाहत होती.
गांधीजी हसले. ते म्हणाले, " पाणी वापरले कि संपते. पाणी हे जीवन आहे. "
भविष्य काळाचा किती अचूक वेध घेतला होता महात्मा गांधीनी !

१३३ साधूने जे केले ते चूक की बरोबर ?

                          १३३  साधूने जे केले ते चूक की बरोबर ?

माणसाच्या जिभेला हाड नसते.
म्हणून माणसाने त्या जिभेचा वापर काळजीपूर्वक केला पाहिजे.
कोठे बोलावे, काय बोलावे, याचे भान माणसाला असले पाहिजे.
मोठ्या स्थानावर असलेल्या माणसांना तर खूपच  !
नाही तर जीभ घसरते, आणि मोठमोठे अनर्थ होतात.

एका तिस्कावर एक साधू तप करीत बसला होता.
अकस्मात एका बाजूने एक गाय धावत पळत आली,
आणि दुसऱ्या वाटेने निघून गेली.
पाच मिनिटांनी एक खाटिक हातात भलामोठा सुरा घेऊन आला.
तिस्कावर पोहोचताच तो गडबडला . गाय कोठे गेली बारे ?
त्याने साधूला गायीच्या जाण्याची दिशा विचारली.

साधूने डोळे उघडले, क्षणभर विचार केला आणि
भलत्याच दिशेकडे बोट दाखविले.
खाटिक त्या दिशेने निघून गेला.
देवतास्वरूप गायीला वाचविण्यासाठी साधूने जे केले
ते चूक की बरोबर ?
मला वाटते . बरोबर ! 

१३२ परवाना आजच समाप्त झाला आहे

                             १३२  परवाना आजच समाप्त झाला आहे

आपल्या देशात इतिहासाची उजळणी करायची पद्धत आहे.
पुराण वाचन असे त्याला म्हणतात.
भारतीय जनसंघाचे ( भाजपा ) म्हालगडे पं. दीनदयाळ उपाध्याय यांची कथा.

पंडित दीनदयाळ उपाध्याय रेल्वेने प्रवास करीत होते.
रेडियोवरील बातम्यांची वेळ झाली.
त्यांनी रेडियोला हात लावला.
काहीतरी आठवले, आणि त्यांनी रेडियो पुन्हा पिशवीत ठेऊन दिला.

बातम्या तर ऐकायला हव्या होत्या. काय करावे बरे ?
त्यांनी इकडे तिकडे बघितले.
शेजारच्या सह प्रवाशाकडे रेडियो दिसत होता.
दीनदयाळजींनी त्याला रेडियो लावायची विनंती केली.

त्या सहप्रवाशाने पंडितजीकडे  बघितले.
एकवार आपादमस्तक न्ह्याहाळले .
तो पंडितजींना म्हणाला, " आपल्याकडे तर रेडियो दिसतो आहे. "

दीनदयाळजी एक मिनिट गप्प राहिले.
ते त्या सहप्रवाशाला म्हणाले, " मी रेडियो अवश्य लावला असता.
पण त्याचा परवाना आजच समाप्त झाला आहे. "
( त्या काळी रेडियोला लायसन्स लागत असे. )

१३१ बकः ध्यान

                                               १३१  बकः ध्यान 

हि आहे एक चिरतरुण कथा
एक होता बगळा. पांढरे शुभ्र कपडे घालणारा.
कोणीही दिसताच आपली बत्तीशी काढणारा.
लोक त्याला म्हणायचे जगमित्र.
होता मात्र पहिल्या क्रमांकाचा ढोंगी.

कालांतराने म्हातारपण आले .
शिकार करायला जमेना.
मग काय ? त्याने केली एक युक्ती.
पाण्यात तो एका पायावर उभा राहिला.

मी तपः श्चर्या सुरु केली आहे.
मी आता मासे खाणे सोडलेय.
मी शाकाहारी झालोय.
मला देव भेटला आहे.
मी तुम्हाला देव दाखवेन.

माशांना खरेच वाटले. 
ते जवळ येऊ लागले.
बगळा एकेकाला चोचीत पकडे.
देव दाखविण्यासाठी डोंगरावर नेई 
आपले उपवासाचे पारणे फेडी .

यालाच म्हणतात बकः ध्यान !
अनेक बगळे या दिवसात तुमच्या घरात येतील.
मासे आपण बनायचे कि नाही ते ठरवा .
जय गोमंतक 

१३० वह हौद से नही आती !

                              १३०  वह हौद से नही आती !

एक आशिल्लो राजा.
तो दरबारात बशिल्लो 
थय  आयलो एक अत्तरवालो.
राजा अत्तर पळयता पळयता एक थेंब सकयल गाद्येचेर पडलो.
राजा खजील जालो.

ताने अत्तरवाल्याक एक बांय भरून अत्तर हाडपक सांगले.
थंय आशिल्लो बिरबल ते आयकून हंसुक लागलो.
ताणे राजाक म्हळे.
' बूंद से गयी वह हौद से नही आती ! '

१२९ त्यांना अंघोळीला गरम पाणी लागते

                              १२९   त्यांना अंघोळीला गरम पाणी लागते

संघटना मोठी कधी होते ?
जेव्हा ती  आपल्या कार्यकर्त्यांची काळजी घेते तेव्हा ! 

पहाटेची वेळ. ते चूल पेटविण्याचा प्रयत्न करीत होते.
प्रयत्नाअंती चूल पेटली. त्यांनी पाणी गरम करायला ठेवले.
ते चुलीत लाकडे सारीत होते. पाणी गरम होत होते.

त्यांची हि धडपड एक माणूस पहात होता.
' तुम्ही हे कशाला करता ? '
माणसाने विचारले ?
' तुम्हाला ठाऊक आहे का ? हि जी  दक्षिणेकडची माणसे आहेत ना !
त्यांना अंघोळीला गरम पाणी लागते.
त्याची व्यवस्था म्हणून हे काम मी करीत आहे.

काही वेळाने अध्यक्ष पदाच्या आसनावर आसीन होणारे ते होते बाल गंगाधर टिळक. 
उगाच का लोक त्यांना  लोकमान्य टिळक म्हणत !

Thursday, December 4, 2014

१४८ इतिहासाचे पुनरावर्तन

                                                       १४८  इतिहासाचे पुनरावर्तन 
   
     काल एका भ्रष्टाचारी माणसाच्या बेंक लोकरवर धाड पडली . अधिकाऱ्यांना त्यात अत्यंत मूल्यवान असे हिरे सापडले . त्या हिऱ्यांची किंमत करण्यासाठी त्यांनी हिऱ्यांच्या व्यापाऱ्यांना बोलाविले . या गरीब देशातील एका माणसाकडे असलेले ते मौल्यवान हिरे बघता बघता तो सराईत शेठ निश्चेष्ठ पडला धराशाही झाला .
     एक घटना आठवली . अल्लाउद्दीन खिलजीने सोरटी सोमनाथ मंदिरावर आक्रमण केले . मंदिराचा विद्ध्वंस करू नये म्हणून ल तेथील लोकांनी त्याला संपत्ती दिली . असे म्हणतात कि, ती संपत्ती मोजता मोजता खिलजीचा  फ़ेरिश्ता चक्कर येउन पडला होता .
     चला इतिहासाची पुनरावृत्ती झाली . 

Wednesday, December 3, 2014

१२८ त्याने कोणती शिक्षा दिली असती ?

                     १२८  त्याने कोणती शिक्षा दिली असती ?

अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या मानवाच्या मुलभूत गरजा आहेत.
या व्यवस्थित पुरविण्याची जबाबदारी सरकारची असते.
अनेक स्वयंसेवी संस्था या कामात सरकारला मदत करीत असतात.
पुण्य मिळवण्याच्या इच्छेने का होईना त्या समाजाची सेवा करीत असतात.
आरोग्य हि अशी एक सेवा.

आई मुलाला गणित शिकवीत होती.
एक साधे सोपे गणित तिने मुलाला घातले.
' औषधाची एक बाटली दोन रुपयांना आणली.
पाच रुपयांना ती विकली.
तर त्याला किती मिळतील ? '
मुलाने उत्तर दिले, ' तीन चाबकाचे फटके ! '
प्रश्नार्थक चेहरा करून आई मुलाकडे बघू लागली.
मुलगा म्हणाला, ' जीवनावश्यक औषधावर जो एवढा नफा घेतो,
त्याला हि शिक्षा फारच कमी आहे. '

हा होता अल्लरी सितारामराजू !
आज औषधासह माणुसकीही विकणाऱ्या माणसाला,
त्याने कोणती शिक्षा दिली असती ?