Sunday, March 31, 2013

कथा विवेकानंद ३३

                          ३३. ककडी घाट

     भारतभ्रमणात स्वामीजी तेव्हा हिमालयाच्या प्रवासात होते . कठीण प्रदेश, पोटात अन्नाचा कण नाही, सतत भ्रमंती . स्वामीजींना क्षणभर काय झाले कळलेच नाही . डोळ्यांसमोर काळी वर्तुळे आली आणि स्वामीजी कोसळले . जमिनीवर पडले. त्यांची शुद्ध हरपली . 
      काही वेळ गेला . समोर एक झोपडी होती . झोपडीतून बाहेर आलेल्या फकिराने पाहिले . समोर एक साधू चक्कर येउन पडलाय . डोक्यावर ऊन, कदाचित काही खाल्लेही नसावे ! 
      फकीर झोपडीत गेला . झोपडीत काही काकड्या होत्या . काकड्या घेऊन फकीर स्वामीजीजवळ आला . त्यांना काकड्या भरवू लागला . काकड्यांच्या त्या शीतल ओलाव्याने स्वामीजी सावध झाले . उठून बसले . फकिराला धन्यवाद देऊ लागले . 
     काही वर्षे गेली . स्वामीजी आता विवेकानंद म्हणून साऱ्या जगाला परिचित झाले होते . भारतात सगळीकडे त्यांचे सत्कार होत होते . 
स्वामी विवेकानंदांचे  अल्मोड्याला आगमन झाले . त्यांचा भव्य सत्कार झाला . सत्कार चालू असताना स्वामीजींना उपस्थितात फकीरबाबा दिसले . मोठ्या प्रमाणे त्यांनी त्यांना जवळ बोलाविले . सगळा प्रसंग सांगितला . ते म्हणाले, " फकीरबाबा नसते तर आज मी तुम्हाला जिवंत दिसू शकलो नसतो . " आज त्या घाटाला ' ककडी घाट ' म्हणून ओळखतात . 

Tuesday, March 26, 2013

कथा विवेकानंद ३२

                ३२. अरे मी तोच रामकृष्ण आहे .

     स्वामी रामकृष्ण आजारी होते . उपचारांचा काहीच परिणाम होत नव्हता . अंतिम घटका जवळ आली होती . सगळे शिष्य चिंतामग्न झाले होते . 
     गुरुजींनी नरेंद्रला जवळ बोलाविले . नोरेन त्यांचा आवडता शिष्य . त्यांचे शिल्लक राहिलेले कार्य पुरे करण्यासाठी त्यांनी निवडलेला शिष्योत्तम . त्यांच्या मागे त्यांच्या परमप्रिय शिष्यांचा दिपस्तंभ !
     आपली सारी आध्यात्मिक शक्ती त्यांनी नोरेनात संक्रमित केली . ते त्याला म्हणाले , ' आज सारे काही तुला देऊन मी फकीर झालो रे ! '
     रामकृष्ण अनेकदा म्हणायचे , ' राम आणि कृष्ण यांचा या युगातील मी अवतार आहे रामकृष्ण . ' नोरेंच्या मनात कधी कधी शंका यायची . आता रामकृष्णाजवळ बसला असताना पुन्हा मनात ती आली . 
' नोरेन अजूनही विश्वास नाही बसत ! अरे मी तोच रामकृष्ण आहे . ' रामकृष्ण क्षीण आवाजात म्हणाले. 
     नरेंद्र चमकला . त्या अवस्थेतही नरेंद्राची संभ्रमावस्था गुरुजींनी अचूक ओळखली होती . 

कथा विवेकानंद ३१

                  ३१ . विशाल वटवृक्ष हो !

     नरेंद्र ध्यान करीत होता . ध्यान करता करता त्याला जाणवू लागले . आपण एका दिव्य तेजात विरघळून जात आहोत . त्याला काय करावे ते समजेना . तो एकदम ओरडला , ' मला हे काय होतंय ! ' 
     नरेंद्र धाडदिशी जमिनीवर कोसळला . कोणाला काय झाले काहीच कळले नाही . सगळे शिष्य सभोवती जमा झाले . नरेंद्र निपचित पडलेला . श्वासोच्छ्वासही बंद . 
     सगळे धावत धावत स्वामी रामकृष्णाकडे गेले . घडलेला प्रसंग सांगू लागले . रामकृष्ण हसले . ते म्हणाले , ' असू दे . थोडा वेळ तसाच राहू दे त्याला . पुष्कळ दिवस मागे लागला होता यासाठी . ' 
     थोड्या वेळाने नरेंद्र सावध झाला . काय घडले ते त्याला समजले . तो धावत गेला रामकृष्णाकडे . नमस्कार घातला . 
     ' झाले ना मनासारखे ? ' रामकृष्ण म्हणाले . 
     नरेंद्र हसला . ' आणि काय इच्छा आहे ? '
     ' या निर्विकल्प समाधीचा लाभ नित्य व्हावा . ' नरेंद्र उद्गारला . 
     स्वामी रामकृष्ण किंचितसे रागावले , " नोरेन , असे स्वार्थी कसे बोलतोस ? अरे , आईने तुझ्यासाठी केवढे मोठाले काम योजले आहे . आणि तू केवळ तुझ्यासाठी मागणे मागतोस . सभोवताली बघ . समाजाकडे लक्ष दे . दुःख , दैन्य , दारिद्र्य दूर करायचेय तुला . यासाठीच तुझा जल्म झालाय रे ! या समाजाचे रक्षण करायचेय तुला ! विशाल वटवृक्ष हो !
     मी नाही देणार तुला निर्विकल्प समाधीचा आनंद . आज मिळाला तेवढा आनंद पुरे . आता समाधी कुलुपबंद . तुझ्या अन्तःकाळी या कुलुपाची किल्ली मी तुला देईन . चल कामाला लाग आता . 

Sunday, March 24, 2013

कथा विवेकानंद ३ ०

                       ३०.  मला सिद्धी नकोत .  

     स्वामी रामकृष्णांनी एकदा नरेंद्राची परीक्षा घ्यायचे ठरविले . दान द्यायचे , मग ते सत्पात्री हवे ना ! नरेंद्राची परीक्षा घ्यायची . 
     रामकृष्ण नरेंद्राला म्हणाले , ' नोरेन, मला काही सिद्धी प्राप्त झाल्या आहेत . कालीमातेने मला त्या दिल्या आहेत . या सिद्धी ज्याच्या जवळ आहेत त्याला जगातील कोणतीही वस्तू सहज प्राप्त होते . एका दृष्टीने तो सर्वशक्तिमान बनतो म्हण ना ! मात्र एक गोष्ट आहे . या सर्वगुणी सिद्धी ज्याला मिळतील त्याला परमेश्वर मात्र मिळणार नाही . बोल ! तुला पाहिजेत का सिद्धी ? '
     क्षणाचाही विलंब न लावता नरेंद्र म्हणाला , ' मला परमेश्वर हवा . त्या सिद्धी बिद्धी काही नकोत मला . '



Saturday, March 23, 2013

कथा विवेकानंद २९

                  २९ मला समाधी  हवीय !

     ' मला परमेश्वर भेटला पाहिजे ' नरेंद्रच्या मनातील  एकमेव विचार. रात्रंदिवस तो परमेश्वराचे चिंतन करी . अभ्यास करताना सुद्धा तो साधनेचा  विचार करे . स्वामी रामकृष्ण आजारी होते . प्रकृती उपचारांना दाद देत नव्हती . 
     नरेंद्रच्या मनात समाधीचा विचार पुन्हा तीव्र झाला . गुरुजींकडे जायलाच हवे . बाहेर पाऊस पडत होता . कोसळत्या त्या पावसाची पर्वा  न करता नरेंद्र स्वामींकडे जायला लागला . 
    नखशिखांत भिजलेला नरेंद्र  स्वामींकडे आला . ' मला निर्विकल्प समाधी  हवीय . '
     रामकृष्ण म्हणाले , ' देईन ना .सावकाश शिकवीन .  '
     नरेंद्र म्हणाला , ' आणि तुमचा आजार वाढला तर . '
     रामकृष्ण क्षणभर गप्प राहिले . हळूहळू ते बोलू लागले . साधनेसंबंधी सांगू लागले . नरेंद्र त्याप्रमाणे करू लागला . त्याला आपल्या शरीरात घडणारे बदल जाणवू लागले . प्रयोग करायचा काय ?
     शिष्य काली जवळच होता . नरेंद्रने त्याला स्पर्श केला . कालीच्या सर्वांगातून वीज निघून गेली . काय घडलेय ते रामकृश्नांच्या लक्षात आले . 
ते नरेंद्राला म्हणाले , " अरे आता कुठे मिळवायला लागलास . आणि लागलीच उधळपट्टी सुरु ? "


Thursday, March 21, 2013

कथा विवेकानंद २८

                       २८.  परीक्षा गुरुजींची !

नरेंद्र प्रतिभावान होता . साहजिकच तो तीक्ष्ण बुद्धी होता . स्वामी रामकृष्णांच्या उपदेशाकडे तो नेहमी चिकित्सक दृष्टीने पाही . त्यावर विचार करी . स्वतःचे मत बनवी . 
गुरु नेहमी सांगतात ' पटल्याशिवाय कोणतीही गोष्ट स्वीकारू नका. धन हे विस्तावासारखे आहे .संन्याशाने त्याच्याजवळ जाऊ नये . ' 
परीक्षा घ्यायची का ? ठरलं ! घ्यायची ! 
गुरुजी बाहेर गेले होते . त्यांचे आसन रिकामे होते . नरेंद्रने इकडे तिकडे बघितले . खोलीत कोणीच नव्हते . त्याने चटकन खिशांतून एक रुपयाचे नाणे काढले . स्वामी रामकृष्णांच्या आसनाखाली ठेऊन दिले . निरागस मुद्रा करून बसून राहिला तो . 
काही वेळाने रामकृष्ण आले . आपल्या आसनावर बसले . आणि एकदम चटका बसल्या प्रमाणे ते उठले . त्यांच्या मांडीखाली रुपयाएवढा भाजलेला डाग आला होता . 
नरेंद्राने स्वामींची क्षमा मागितली. ' मी तुमची परीक्षा घेतली.' तो म्हणाला . रामकृष्ण म्हणाले, ' बरोबर आहे . कोणतही विचार स्वीकारताना तो पारखिल्याशिवाय स्वीकारू नये . नरेंद्रने बरोबरच केले आहे . ' 

Saturday, March 16, 2013

कथा विवेकानंद २७

                            २ ७ . अद्वैत सिद्धांत !

     स्वामी रामकृष्णाकडे नरेंद्र यायला लागला . ते त्याला अध्यात्मिक ज्ञान द्यायला लागले . आद्य शंकराचाऱ्यांचा अद्वैत सिद्धांत सांगताना ते म्हणाले, ' बघ हे सगळे जग ब्रह्ममय आहे . मी, तू ,झाडेच काय हे दगड सुद्धा ब्रह्म आहे . ' नरेंद्राचा विश्वास बसला नाही . 
     खोलीतून बाहेर आल्यावर त्याची मित्रांसमवेत थट्टा सुरु झाली . हा तांब्या ब्रह्म , हा खांब ब्रह्म , ब्रह्म , ब्रह्म !
     रामकृष्ण त्यांची हि थट्टा मस्करी ऐकत होते . ते बाहेर आले . नरेंद्रच्या खांद्यावर हात ठेवत ते म्हणाले , ' काय चाललेय ! मलाही ऐकवा ना ? '
    नरेंद्राला काय झाले काहीच कळले नाही . काही तरी झालेय नक्की .  दोन दिवस नरेंद्र सगळीकडे ब्रह्मच बघत होता . खाणे ब्रह्म, पिणे ब्रह्म, चालणे ब्रह्म, बसणे ब्रह्म ! 
     चारेक दिवसांनी रामकृष्ण म्हणाले, ' काय नरेन, समजला का शंकरचार्यांचा अद्वैत सिद्धांत ! '

Thursday, March 14, 2013

कथा विवेकानंद २६

                           २६. मला भूक नाही .

     नरेंद्रच्या वडिलांचे निधन झाले . वकील असल्यामुळे वडिलांचे उत्पन्न भरपूर . ' असतील शिते तर जमतील भुते ' या न्यायाने नातेवाईकांचा गोतावळा भरपूर जमा झालेला . गुळाला मुंगळे डसणारच . 
     विश्वनाथ बाबूंचे निधन होताच उत्पन्नाचा स्त्रोत बंद झाला . खायचे काय ? नातेवाईकांनी आपापल्या घरची वाट पकडली . जवळच्यांनी घरावर कोर्टाचा दावा लावला . आई तशी धीराची . आपल्या कच्च्या बच्च्यांना घेऊन संसाराचा गाडा ओढू लागली . 
     नरेंद्र पदवी परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला . संसाराला हात लागावा म्हणून तो नोकरी शोधू लागला . अनेक कार्यालयांचे उंबरठे झिजवले . पण नोकरी काही मिळेना . 
     एके रात्रीचा प्रसंग . नरेंद्र दमून भागून घरी आला . पोटाला भूक लागली होती . आई जेवण तयार करीत होती . नरेंद्र स्वयंपाक घरात डोकावला . जेवण थोडेच बनविले होते . त्याने आईला सांगितले . ' आई आज मी बाहेरून जेऊन आलेलो आहे . मला भूक नाही . ' 
     आपल्या भावंडांना थोडेतरी खायला मिळावे म्हणून नरेंद्र खोटे बोलला होता . 

Saturday, March 9, 2013

कथा विवेकानंद २५

                २५.ईश्वरत्वाची जाणीव !

     देव आहे का ? या नरेंद्रच्या प्रश्नाला स्वामी रामकृष्णांनी ' होय ' असे स्पष्ट उत्तर दिले होते . रामकृष्णांना एकदा भेटलेच पाहिजे . तो दक्षिणेश्वरला निघाला . 
     नरेनला पाहताच रामकृष्णांना आनंद झाला . ते त्याच्याशी गप्पागोष्टी करू लागले . बोलत असताना रामकृष्णाना जाणवले नरेंद्राचा देवावरील विश्वास दृढ झालेला नाहीये . याला जाणीव करून द्यायला हवीय . 
     रामकृष्णानी आपल्या उजव्या पायाच्या अंगठ्याने नरेंद्राला स्पर्श केला . क्षणकाल काय झाले नरेंद्राला समजलेच नाही . सगळे जग आपल्याभोवती फिरत आहे, आपण कोठेतरी शून्यात विलीन होत आहोत असे त्याला वाटू लागले . तो विस्मित झाला . 
     रामकृष्णांनी स्पर्श मागे घेतला . सगळे पूर्ववत झाले . नोरेन भानावर आला . एका नव्या विश्वाची जाणीव त्याला झाली होती . 

Monday, March 4, 2013

कथा विवेकानंद २४

              २४. होय मी ईश्वराला पाहिले आहे . 

     १५ जानेवारी १८८२ चा दिवस . नरेंद्र सुरेन्द्रबाबुच्या घोडागाडीतून दक्षिणेश्वरला जायला निघाला . रामकृष्णाच्या खोलीत माणसांची दाटी होती . नरेंद्राला बघताच स्वामींनी त्याला भजन म्हणायचा आग्रह केला . नरेंद्र गाऊ लागला . रामकृष्णाची समाधी लागली . सगळे वातावरण भारुन गेले. 
     समाधी अवस्था उतरल्यावर स्वामी नरेनला बाजूच्या खोलीत घेऊन गेले . ते म्हणाले, " आपण देव आहांत . किती उशीर केलास रे यायला नारायणा ! "
     नरेंद्राला ते वेड्यासारखे काहीतरी बोलतात असे वाटले . 
आपल्या मनातील तो चिरपरिचित प्रश्न त्याने रामकृष्णांना विचारला, " आपण देव पाहिला आहे काय ? "
     रामकृष्ण हसले . म्हणाले, " बाळा, होय मी ईश्वराला पाहिले आहे . आता मी तुला जसा पाहतो तसा किंबहुना त्यापेक्षा स्पष्ट मी त्याला पाहतो आहे.  "
     स्वामी रामकृष्णांनी नरेंद्राला मिठाई खाऊ घातली . त्याला म्हणाले, ' सवडीने एकदा पुन्हा ये . बोलू आपण . '

कथा विवेकानंद २३

        २३ .याला एकदा दक्षिणेश्वरी घेऊन या ना !


     नरेंद्रच्या घराजवळ सुरेंद्रनाथ नावाचे सदगृहस्थ रहात असत . त्यांचे आणि श्रीरामकृष्णांचे शिष्य गुरुचे नाते होते . आपल्या घरी त्यांनी एक घरगुती कार्यक्रम केला होता . या कार्यक्रमात त्यांनी रामकृष्णाना बोलाविले . 
     नरेंद्र छान भजने म्हणी . या प्रसंगी त्यांनी नरेंद्राला भजने म्हणायला लावली . नरेंद्र तल्लीन होऊन गाऊ लागला . रामकृष्ण ऐकू लागले . 
     कार्यक्रम संपल्यावर ते सुरेन्द्र्नाथांना म्हणाले, ' या मुलाच्या आवाजात स्वर्गीय सौदर्य आहे . याला एकदा दक्षिणेश्वरी घेऊन या ना ! '