Sunday, March 31, 2013

कथा विवेकानंद ३३

                          ३३. ककडी घाट

     भारतभ्रमणात स्वामीजी तेव्हा हिमालयाच्या प्रवासात होते . कठीण प्रदेश, पोटात अन्नाचा कण नाही, सतत भ्रमंती . स्वामीजींना क्षणभर काय झाले कळलेच नाही . डोळ्यांसमोर काळी वर्तुळे आली आणि स्वामीजी कोसळले . जमिनीवर पडले. त्यांची शुद्ध हरपली . 
      काही वेळ गेला . समोर एक झोपडी होती . झोपडीतून बाहेर आलेल्या फकिराने पाहिले . समोर एक साधू चक्कर येउन पडलाय . डोक्यावर ऊन, कदाचित काही खाल्लेही नसावे ! 
      फकीर झोपडीत गेला . झोपडीत काही काकड्या होत्या . काकड्या घेऊन फकीर स्वामीजीजवळ आला . त्यांना काकड्या भरवू लागला . काकड्यांच्या त्या शीतल ओलाव्याने स्वामीजी सावध झाले . उठून बसले . फकिराला धन्यवाद देऊ लागले . 
     काही वर्षे गेली . स्वामीजी आता विवेकानंद म्हणून साऱ्या जगाला परिचित झाले होते . भारतात सगळीकडे त्यांचे सत्कार होत होते . 
स्वामी विवेकानंदांचे  अल्मोड्याला आगमन झाले . त्यांचा भव्य सत्कार झाला . सत्कार चालू असताना स्वामीजींना उपस्थितात फकीरबाबा दिसले . मोठ्या प्रमाणे त्यांनी त्यांना जवळ बोलाविले . सगळा प्रसंग सांगितला . ते म्हणाले, " फकीरबाबा नसते तर आज मी तुम्हाला जिवंत दिसू शकलो नसतो . " आज त्या घाटाला ' ककडी घाट ' म्हणून ओळखतात . 

No comments:

Post a Comment