Friday, December 12, 2014

१३७ भ्रष्टाचाराचा कुजन्म झाला.

                                  १३७  भ्रष्टाचार 

     ऐका हो ऐका ! हि आहे भ्रष्टाचाराची कुळकथा . एक आटपाट नगर होते . दिल्ली त्याचे नाव . नुकताच तेथे राजाचा राज्याभिषेक झाला होता . मिठाई वाटली होती फटाके फोडले होते . नव्या नवलाईने सगळे न्हाऊन निघाले होते . राजाचे तर कोण कोडकौतुक ! गोरागोमटा, टोकदार नाकाचा , फाडफाड विन्गलीश बोलणारा , सुंदर गुलाबांशी खेळणारा . देश
नुकताच स्वतंत्र झालेला . सोनेरी भविष्याची भव्य स्वप्ने लोकांच्या डोळ्यात तरळत असलेली . 
     भारतीय संरक्षण दलासाठी तीन हजार जीप गाड्यांची आवश्यकता होती. कृष्ण मेनन तेव्हा लंडन मध्ये भारतीय उच्चायुक्त होते. अमेरिकेकडून एक हजार नवीन  जीपगाड्या खरेदी करण्यात आल्या.
इकडे कृष्ण मेननानी दोन हजार जीपगाड्या इंग्लंड कडून विकत घेतल्या. इंग्लंडने जुन्या जीपगाड्या त्यांत दुरुस्ती व रंगरंगोटी करून भारताच्या माथी नवीन म्हणून मारल्या. इंग्लंडच्या या जीप गाड्यांना अमेरिकेच्या जीप  इतकेच  पैसे द्यायला मेनन विसरले नाहीत. तत्कालीन प्रधानमंत्री पं. नेहरूंनी मेननला झाडायचे सोडून त्याच्या या कृष्णकृत्यावर  पांघरूण  घातले. सुरकुती पडू न देता पांघरूण घातले  आणि  स्वतंत्र  भारतात   भ्रष्टाचाराचा कुजन्म झाला.

१३६ प्रभातीचा दुर्गंध

                                    १३६   प्रभातीचा दुर्गंध 


अनेक लोक सिंगापूरला जातात.
गोव्यात आल्यावर तिथल्या स्वच्छतेवर ते  छान बोलतात.
कुठेही कागद - कपटा, पिंक नाही. प्लास्टिक पिशव्या-बाटल्या नाहीत.
तुम्ही शहाळे खा. करवंटी मात्र विशिष्ट जागीच  टाकली  पाहिजे.
अस्वच्छतेला शिक्षा आहेच, त्याचबरोबर लोकही नाक मुरडताना दिसतील.

शहरात राहणाऱ्या एका महाभागाची कथा बघा !
सकाळची प्रसन्न वेळ. शांत मंद वारा. तसाच प्रकाशही !
हा सभ्य गृहस्थ आपल्या कुत्र्याला फिरविण्यासाठी बाहेर पडला.
सांखळीत अडकवलेली  पांढऱ्या शुभ्र रंगाची विदेशी पामेरियन कुत्री.
रमत-गमत, दुसर्यांच्या गाडीच्या टायरावर मुत्रदान करीत मजेत चाललीय.

एक सुबकसे घर. घरासमोर सुंदर फुले फुललीत. सुवासही पसरलाय.
हे महाशय तिथे थाबलेत. घरमालकाच्या नकळत फुले काढताहेत.
साध्या, सरळ शब्दात सांगायचेय तर चोरताहेत. बरोबर ना ?
हे गृहस्थ फुले तोडताहेत म्हणजे घरमालकाचा परिमल, सुगंध नेताहेत.
आणि इकडे खाली जमिनीवर ती कुत्री एकाग्रचित्ते आपले प्रातर्विधी उरकते आहे.
थोड्याश्या अतिशयोक्त शब्दात म्हणजे घरमालकावर ह्गते आहे.

घरमालकाने दारी फुलझाडे  लावली, प्रभाती घरात सुगंध येतो ! 
फुलांच्या चोरीसमवेत हा महाभाग मालकाला दुर्गंध देतो.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे !!!!!

Sunday, December 7, 2014

१३५ मोठ्या प्रवासाला तो निघून गेलाय.

                            १३५  मोठ्या प्रवासाला तो निघून गेलाय.

संध्याकाळची वेळ !
नेहमीप्रमाणे सगळी मुले शिकवणुकीसाठी जमली होती.
आपापला दिलेला अभ्यास मन लावून  सगळी करीत होती.
गंगाधरशास्त्री मोठ्या लाकडी पेटीला टेकून बसले होते.
मुलांनी विचारलेल्या शंकांचे निरसन करीत होते.
मधून मधून आपले डोळे ते बंद करीत.

शिकवणी संपली. मुले गंगाधरशास्त्रीकडे मघापासून पाहत होती.
त्यांच्या बरोबर नेहमी अभ्यासाला बसणारा दुदिराज आज दिसत नव्हता.
मुलांनी गुरुजीना विचारले, ' दुदिराज कुठे गेलाय ?  '
गुरुजी गप्प बसले. त्यांनी डोळे मिटून घेतले.
मुलांनी पुन्हा विचारले.
गुरुजी म्हणाले, " माणसे जिथून परत येत नाहीत अशा मोठ्या
प्रवासाला तो निघून गेलाय.  आत्ताच त्याला पोहोचवून मी आलोय. "

स्तंभित झालेली ती मुले गुरुजीना म्हणाली.
' आणि  तुम्ही एक शब्दही न बोलता आमची शिकवणी घेतलीत ? '
गुरुजी म्हणाले, " बाळांनो तुम्ही किती दूरवरून चालत येता.
तुमचा आजचा दिवस वाया गेला असता ना ?
आणि हे दुःख आता मला नेहमीचेच आहे ना ? "

' शिष्येदिच्छा पराजयेत ' विद्यार्थ्यांना  आपल्यापेक्षा मोठा करणाऱ्या शिक्षकांना,
माझ्या सगळ्या ज्ञात अज्ञात शिक्षकांना माझा साष्टांग नमस्कार.

१३४ पाणी हे जीवन आहे

                                      १३४   पाणी हे जीवन आहे

आज जलसंपत्ती दिन आहे. जल म्हणजे जीवन.
माणसाच्या जीवनाशी निगडीत पंचमहाभूतांपैकी पहिले दैवत.
आप,पाणी,नीर,तोय,उदक जवळ जवळ ७० प्रतिशब्द संस्कृत मध्ये सापडतील.
एवढे महत्वाचे दैवत पाणी आहे. त्याचा जपून वापर केला पाहिजे.

पूर्वी सरकारने गावोगावी सार्वजनिक नळ बसविले होते.
प्रतिष्ठितानी त्यांना पाईप लावून कवाथे शिंपणे,गाड्या धुणे वगैरे उद्योग सुरु केले.
शेजारणीची लक्तरे सार्वजनिक नळावर धुताना,
कळशी भरून वाहतेय याचे भान महिलांनी कुठे ठेवले ?
परिणामी सरकारने कनेक्शन व भंगारवाल्यांनी नळ नेल्यावर,
कोन्क्रीटचे खांब तेवढे शिल्लक राहिले.

कॉंग्रेसचे अधिवेशन अलाहाबादला भरले होते.
दुपारचे जेवण झाले. गांधीजी हात धुवायला उठले.
मंडपाबाहेर पाण्याची बादली ठेवली होती.
नेहरूंनी गांधीजींच्या हातावर भस्स करून पाणी  ओतले.
गांधीजी म्हणाले, " पाणी जपून वापरावे. "

नेहरूंनी समोर बघितले. गंगा दुथडी भरून वाहत होती.
गांधीजी हसले. ते म्हणाले, " पाणी वापरले कि संपते. पाणी हे जीवन आहे. "
भविष्य काळाचा किती अचूक वेध घेतला होता महात्मा गांधीनी !

१३३ साधूने जे केले ते चूक की बरोबर ?

                          १३३  साधूने जे केले ते चूक की बरोबर ?

माणसाच्या जिभेला हाड नसते.
म्हणून माणसाने त्या जिभेचा वापर काळजीपूर्वक केला पाहिजे.
कोठे बोलावे, काय बोलावे, याचे भान माणसाला असले पाहिजे.
मोठ्या स्थानावर असलेल्या माणसांना तर खूपच  !
नाही तर जीभ घसरते, आणि मोठमोठे अनर्थ होतात.

एका तिस्कावर एक साधू तप करीत बसला होता.
अकस्मात एका बाजूने एक गाय धावत पळत आली,
आणि दुसऱ्या वाटेने निघून गेली.
पाच मिनिटांनी एक खाटिक हातात भलामोठा सुरा घेऊन आला.
तिस्कावर पोहोचताच तो गडबडला . गाय कोठे गेली बारे ?
त्याने साधूला गायीच्या जाण्याची दिशा विचारली.

साधूने डोळे उघडले, क्षणभर विचार केला आणि
भलत्याच दिशेकडे बोट दाखविले.
खाटिक त्या दिशेने निघून गेला.
देवतास्वरूप गायीला वाचविण्यासाठी साधूने जे केले
ते चूक की बरोबर ?
मला वाटते . बरोबर ! 

१३२ परवाना आजच समाप्त झाला आहे

                             १३२  परवाना आजच समाप्त झाला आहे

आपल्या देशात इतिहासाची उजळणी करायची पद्धत आहे.
पुराण वाचन असे त्याला म्हणतात.
भारतीय जनसंघाचे ( भाजपा ) म्हालगडे पं. दीनदयाळ उपाध्याय यांची कथा.

पंडित दीनदयाळ उपाध्याय रेल्वेने प्रवास करीत होते.
रेडियोवरील बातम्यांची वेळ झाली.
त्यांनी रेडियोला हात लावला.
काहीतरी आठवले, आणि त्यांनी रेडियो पुन्हा पिशवीत ठेऊन दिला.

बातम्या तर ऐकायला हव्या होत्या. काय करावे बरे ?
त्यांनी इकडे तिकडे बघितले.
शेजारच्या सह प्रवाशाकडे रेडियो दिसत होता.
दीनदयाळजींनी त्याला रेडियो लावायची विनंती केली.

त्या सहप्रवाशाने पंडितजीकडे  बघितले.
एकवार आपादमस्तक न्ह्याहाळले .
तो पंडितजींना म्हणाला, " आपल्याकडे तर रेडियो दिसतो आहे. "

दीनदयाळजी एक मिनिट गप्प राहिले.
ते त्या सहप्रवाशाला म्हणाले, " मी रेडियो अवश्य लावला असता.
पण त्याचा परवाना आजच समाप्त झाला आहे. "
( त्या काळी रेडियोला लायसन्स लागत असे. )

१३१ बकः ध्यान

                                               १३१  बकः ध्यान 

हि आहे एक चिरतरुण कथा
एक होता बगळा. पांढरे शुभ्र कपडे घालणारा.
कोणीही दिसताच आपली बत्तीशी काढणारा.
लोक त्याला म्हणायचे जगमित्र.
होता मात्र पहिल्या क्रमांकाचा ढोंगी.

कालांतराने म्हातारपण आले .
शिकार करायला जमेना.
मग काय ? त्याने केली एक युक्ती.
पाण्यात तो एका पायावर उभा राहिला.

मी तपः श्चर्या सुरु केली आहे.
मी आता मासे खाणे सोडलेय.
मी शाकाहारी झालोय.
मला देव भेटला आहे.
मी तुम्हाला देव दाखवेन.

माशांना खरेच वाटले. 
ते जवळ येऊ लागले.
बगळा एकेकाला चोचीत पकडे.
देव दाखविण्यासाठी डोंगरावर नेई 
आपले उपवासाचे पारणे फेडी .

यालाच म्हणतात बकः ध्यान !
अनेक बगळे या दिवसात तुमच्या घरात येतील.
मासे आपण बनायचे कि नाही ते ठरवा .
जय गोमंतक 

१३० वह हौद से नही आती !

                              १३०  वह हौद से नही आती !

एक आशिल्लो राजा.
तो दरबारात बशिल्लो 
थय  आयलो एक अत्तरवालो.
राजा अत्तर पळयता पळयता एक थेंब सकयल गाद्येचेर पडलो.
राजा खजील जालो.

ताने अत्तरवाल्याक एक बांय भरून अत्तर हाडपक सांगले.
थंय आशिल्लो बिरबल ते आयकून हंसुक लागलो.
ताणे राजाक म्हळे.
' बूंद से गयी वह हौद से नही आती ! '

१२९ त्यांना अंघोळीला गरम पाणी लागते

                              १२९   त्यांना अंघोळीला गरम पाणी लागते

संघटना मोठी कधी होते ?
जेव्हा ती  आपल्या कार्यकर्त्यांची काळजी घेते तेव्हा ! 

पहाटेची वेळ. ते चूल पेटविण्याचा प्रयत्न करीत होते.
प्रयत्नाअंती चूल पेटली. त्यांनी पाणी गरम करायला ठेवले.
ते चुलीत लाकडे सारीत होते. पाणी गरम होत होते.

त्यांची हि धडपड एक माणूस पहात होता.
' तुम्ही हे कशाला करता ? '
माणसाने विचारले ?
' तुम्हाला ठाऊक आहे का ? हि जी  दक्षिणेकडची माणसे आहेत ना !
त्यांना अंघोळीला गरम पाणी लागते.
त्याची व्यवस्था म्हणून हे काम मी करीत आहे.

काही वेळाने अध्यक्ष पदाच्या आसनावर आसीन होणारे ते होते बाल गंगाधर टिळक. 
उगाच का लोक त्यांना  लोकमान्य टिळक म्हणत !

Thursday, December 4, 2014

१४८ इतिहासाचे पुनरावर्तन

                                                       १४८  इतिहासाचे पुनरावर्तन 
   
     काल एका भ्रष्टाचारी माणसाच्या बेंक लोकरवर धाड पडली . अधिकाऱ्यांना त्यात अत्यंत मूल्यवान असे हिरे सापडले . त्या हिऱ्यांची किंमत करण्यासाठी त्यांनी हिऱ्यांच्या व्यापाऱ्यांना बोलाविले . या गरीब देशातील एका माणसाकडे असलेले ते मौल्यवान हिरे बघता बघता तो सराईत शेठ निश्चेष्ठ पडला धराशाही झाला .
     एक घटना आठवली . अल्लाउद्दीन खिलजीने सोरटी सोमनाथ मंदिरावर आक्रमण केले . मंदिराचा विद्ध्वंस करू नये म्हणून ल तेथील लोकांनी त्याला संपत्ती दिली . असे म्हणतात कि, ती संपत्ती मोजता मोजता खिलजीचा  फ़ेरिश्ता चक्कर येउन पडला होता .
     चला इतिहासाची पुनरावृत्ती झाली . 

Wednesday, December 3, 2014

१२८ त्याने कोणती शिक्षा दिली असती ?

                     १२८  त्याने कोणती शिक्षा दिली असती ?

अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या मानवाच्या मुलभूत गरजा आहेत.
या व्यवस्थित पुरविण्याची जबाबदारी सरकारची असते.
अनेक स्वयंसेवी संस्था या कामात सरकारला मदत करीत असतात.
पुण्य मिळवण्याच्या इच्छेने का होईना त्या समाजाची सेवा करीत असतात.
आरोग्य हि अशी एक सेवा.

आई मुलाला गणित शिकवीत होती.
एक साधे सोपे गणित तिने मुलाला घातले.
' औषधाची एक बाटली दोन रुपयांना आणली.
पाच रुपयांना ती विकली.
तर त्याला किती मिळतील ? '
मुलाने उत्तर दिले, ' तीन चाबकाचे फटके ! '
प्रश्नार्थक चेहरा करून आई मुलाकडे बघू लागली.
मुलगा म्हणाला, ' जीवनावश्यक औषधावर जो एवढा नफा घेतो,
त्याला हि शिक्षा फारच कमी आहे. '

हा होता अल्लरी सितारामराजू !
आज औषधासह माणुसकीही विकणाऱ्या माणसाला,
त्याने कोणती शिक्षा दिली असती ?

Saturday, November 29, 2014

१२७ मतदानस्य कथा रम्यः

                                    १२७  मतदानस्य  कथा रम्यः

युद्धस्य कथा रम्यः असे म्हणतात.
निवडणुकीच्या गोष्टीही कमी रम्य नसतात.

आमदारकीची स्वप्ने  पाहणाऱ्या  मुलीकडे एक बेरोजगार गेला.
त्याने तिच्याकडे नोकरीची मागणी केली.
' पैसे घेऊन ये. ' तिने हुकुम सोडला.
नोकरीची निकड होती.
कसेबसे त्याने तीन लाख रुपये जमविले.

पैसे घेऊन तो तिच्याकडे गेला.
केवळ तीन लाख रुपये.
तिच्या पायाचा राग मस्तकात गेला.
' हे पोयशे व्होरून गांडीत घाल ' ती उद्गारली.
तो घरी आला.

निवडणूक जाहीर झाली.
निवडणुकीला ती उभी राहिली.
मते मागत  फिरता फिरता ती त्याच्या दारी आली.
मत मागताना पैसे पुढे करीत ती म्हणाली, ' हे घे '
मागच्या अनुभवाची सव्याज परतफेड करताना तो म्हणाला,
' ते पोयशे व्होरून तुज्या  xxx  घाल ! '

१२६ इंद्र परत स्वर्गाचा राजा बनला

                               १२६   इंद्र परत स्वर्गाचा राजा बनला

देवांचा राजा इंद्र.
त्याच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत.
इंद्राला सहस्त्राक्ष, हजार डोळे आहेत असे म्हणतात.
याचा अर्थ त्याला सगळे माहित होत असते असा आहे.
म्हणूनच तो तिन्ही लोकांचा स्वामी, जगाचा राजा.

आपल्या प्रचंड तपामुळे ययातीला इंद्रपद मिळाले.
सारी सुखे हात जोडून समोर उभी राहिली.
काही दिवस असेच गेले.
इंद्राला आता आपल्या इंद्रपदाची आठवण होऊ लागली.
काय करावे बरे !
इंद्रच तो ! उपाय काढल्याविना थोडाच राहील.

इंद्राने स्तुतीपाठकांचा एक जथाच स्वर्गात पाठवून दिला.
यथावकाश त्यांनी आपले जाळे विणायला सुरुवात केली.
ययाती केवढा मोठा, पराक्रमी, सुंदर, महान !
स्तुतीच्या वर्षावात  ययाती चिंब चिंब होऊ लागला.

ययातीला गर्व चढू लागला.
कोणतीही गोष्ट जितकी घोटावी तितकी चढत जाते.
हळूहळू त्याने आत्मस्तुती करायला सुरुवात केली.
धर्मराजाने आत्मस्तुतीला आत्महत्येच्या बरोबरीचे पाप मानले आहे.
ययातीचे तेज कमी होऊ लागले.

त्याने पुढची पायरी गाठली.
परनिन्देला आरंभ केला.
परिणाम स्पष्ट होता.
ययातीचे तेज इंद्रापेक्षा कमी झाले.
ययाती सत्ताच्युत झाला.
इंद्र परत स्वर्गाचा राजा बनला.

१२५ एक सेकंद चुकलो

                                     १२५   एक सेकंद चुकलो

कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला .
सगळे जळत होते .
त्यात काय कठीण आहे .
मीही लावला असता कि !
तो काय मोठा लागून गेलाय !

एके दिवशी कोलंबसने सर्वांना प्रयोगशाळेत बोलावले .
 हे आहे अंडे आणि हे टेबल . टेबलावर अंडे उभे करायचे .
लागले सगळे प्रयत्न करायला .
एखादा क्षण अंडे उभे रहायचेही, पण दुसऱ्या क्षणी कोलमडायचे .
' मी  करतो ' कोलंबस म्हणाला .
दुसऱ्याच क्षणी अंडे उभे .
सगळ्यांची जीभ टाळूला .
कसे केले ? सगळ्याचा एकाच क्षणी प्रश्न .
कोलंबसने चादर वर उचलली .
चादरीखाली  मिठाचा ढीग होता, अगदी छोटासा .
अरेच्चा ! केवळ एक सेकंद चुकलो .

Thursday, September 25, 2014

१२४ तीच संशोधने यशस्वीही होतात


                               १२४  तीच संशोधने यशस्वीही होतात

     भारतीय मंगलयान मंगल गहाच्या कक्षेत यशस्वीपणे स्थापन केल्याबद्धल इस्रो या भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे अभिननदन . आपल्या पहिल्याच प्रयत्नात आणि कमी खर्चात यशस्वी झाल्यामुळे तर उत्तुंग  गौरवप्राप्त झालेत . संपूर्ण देश आज त्यांना आदरपूर्वक प्रणाम करीत आहे . शाबास पठ्ठे  !
    चांगल्याला थोडेसे गालबोटही हवे . त्याप्रमाणे मोदी , मंगळ व सरती अमावास्या यावरून काहींना मळमळले . काहीजणांनी सोशल मिडीयावरती उलटी करून आपल्या कोत्या मनोवृत्तीचे ओंगळ प्रदर्शनही घडविले  . अनाडी लोकांच्या या आदळआपटीकडे  कानाडोळा करणेच योग्य होईल .
     लखनौ विश्वविद्यालय . ज्येष्ठ भारतीय शास्त्रज्ञ बिरबल सहानी तेथे काम करीत होते . शास्त्रज्ञांचे एक विदेशी शिष्टमंडळ त्यांना भेटायला येणार होते .
     बिरबल सहानी पडले संशोधक . साहजिक ते आपल्या संशोधनात मग्न होते . कामाच्या व्यस्ततेत वेळ कधी कसा निघून गेला काही कळलेच नाही . ते विदेशी शिष्टमंडळ सरळ सहानीच्या प्रयोगशाळेत येउन दाखल झाले .
    एका छोट्याश्या अडगळीच्या खोलीच्या कोपऱ्यात सहानी काम करीत होते . त्या महान  भारतीय शास्त्रज्ञाकडे आणि त्यांच्या त्या लडखडणाऱ्या टेबलाकडे पहात ते विदेशी शास्त्रज्ञ उद्गारले, " ही तुमची प्रयोगशाळा ? '
     " माझ्या देशाला एवढेच परवडते ."  बिरबल सहानी म्हणाले . पुढे म्हणाले, " संशोधने अशाच ठिकाणी होतात . आणि तीच यशस्वीही होतात . " 

Saturday, July 19, 2014

१२३ हात उलटा, सायकल पलटा


                  १२३  हात उलटा, सायकल पलटा 

     हायर सेकंडरीतले दिवस . पाचसहा मित्र चालत चाललो होतो . गावगप्पा गोष्टीगजाली . हसत खिदळत कॉलेज जवळ करीत होतो . सकाळ असल्याने महामार्गावर वाहने कमी . एखाददुसरे रोरावत निघून जाई. त्याला वाट करून दिली की पुन्हा रस्ता व्यापायला आम्ही मोकळे . 
     ' किण किण, किण किण ' मागून सायकलच्या घंटीचा आवाज . मागे वळलो तर सुरेश ! सुऱ्या ! आज सायकलवरून आला होता . शायनिंगचा मूड तर त्याचा अतिउत्साही चेहरा ओरडून ओरडून सांगत होता . 
     ' मी हात उलटे धरून सायकल चालवितो . तुम्हाला कुणाला येते का ?  बेट ( पैज ) मारायची का ? ' कोसळणाऱ्या धबधब्यावर पाणी ओतून काय फायदा ! 
     ' चला मीच चालून दाखवितो . हे बघा . '
     सुऱ्याने हेन्डलवर डाव्या जागी उजवा व उजव्या जागी डावा हात पकडला . हातांची कातर केली . पायडल मारले आणि सायकल चालू  झाली . 
     ' जितं मया ' च्या आवेशात दोनचार मीटर गेला असेल नसेल ! अकस्मात समोरून एन. पी. ट्रकाने एन्ट्री घेतली . वाहन समोर आल्यावर आपण काय करतो ? सायकल डावीकडे वळविण्यासाठी डावा हात मागे करतो व त्याच बरोबर उजवा हात पुढे करतो . सुऱ्याने बरोब्बर तसेच केले . पण हाय रे कर्मा ! हात उलटे असल्याने सायकल उजवीकडे वळली . सुऱ्याच्या गोट्या मस्तकात ! 
     हात उलटे असल्याचे लक्षात येताच सुऱ्याने वेळ नाही घालवला . झटक्यात उलटा व्यवहार केला . डावा हात पुढे घेतला . उजवा हात मागे घेतला . सर्वशक्तीनिशी पायडल दाबला आणि आणि …डावीकडील मीटर दीड मीटर खोलीच्या शेतामध्ये धाडदिशी पतन . 
     चौकोनी करंदीकरांच्या त्रिकोणी व्याकरणाला गोल करीत वर्गात अनुप्रास जुळला . ' सादोळशेच्या सुऱ्याने सोनी सायकलवरून सोमवारी  सकाळी  सुंदर सूर्याला सिर साष्टांग सूर्यनमस्कार घातला . ' अन वर्गात हास्याचा धबधबा फुटला . `

Tuesday, July 8, 2014

१२२ काणी खाणी कोतवा . . . .

१२२ काणी खाणी कोतवा . . . . 
     
     संध्याकाळची वेळ . पाय मोकळे करण्यासाठी बाहेर पडलो .साहजिकच देवळाच्या दिशेने पावले वळाली . वाटेत मित्र दिसला आणि थबकलो .शिळोप्याच्या गप्पा रंगल्या .
     मित्राचा निरोप घेणार इतक्यात कच्चदिशी रोधक लागले . गाडी उभी झाली .गावातील एक माणूस गाडीतून उतरत होता .विदेशी बनावटीची किमती गाडी . काळ्या रंगाच्या काचा. दिमाखदार आकार . हा माणूस खाण  व्यवसायात उतरल्याचे कानावर आले होते .खोऱ्यानी पैसा ओढतोय असेही ऐकले होते . पण इतके ?
     क्षणभर गतकाळात गेलो . रस्त्याच्या कडेला बसून आल्या गेल्याची टिंगल टवाळी करणारा हा .एखादी देणारा आणि चार खाणारा .शिक्षणाचा गंधही नाही .खिशात दमडी नाही . आणि आज कोठल्या कोठे !
     " वळण घ्यायला आलो होतो . तुम्ही दिसलात आणि थांबलो . " तो उदगारला . दोन शब्द बोलून तो जायला निघाला . दूर संवेदीने त्याने दार उघडले . गाडीत बसला .आणि गरकन त्याने वळण घेतले . गाडी विदेशी होती पण रस्ता स्वदेशी होता .खाड्कन कडेच्या दगडाला त्याने गाडी ठोकरली . 
     माझ्या मनात विचार आला .आता तो खाली उतरणार .सरकारला, बांधकाम खात्याला शिव्या घालणार . पण कुठचे काय ? काहीही झाले नसल्याच्या अविर्भावात तो सुळकन निघून गेला होता . शर्टाच्या बाहीवर पडलेला मातीचा कण टिचकीने उडवावा तसा तो गाडीचा धक्का त्याने उडविला .
     .मित्र  म्हणत होता  " या गाडीची किमत आहे ४८ लाख  "

१२१ आणि सहकार भांडाराची दृष्ट निघाली

             १२१ आणि सहकार भांडाराची दृष्ट निघाली
     
    सकाळचा प्रसंग . सामान घेण्यासाठी सहकार भांडारात गेलो होतो . मला पाहिजे ते सामान घेऊन पैसे देण्यासाठी रांगेत उभा राहिलो. माझ्या पुढे एक बाई होती.  तिच्या सामानाची किंमत करण्याचे काम सुरु होते . 
     किंमत करता करता रोखीने मिठाची पिशवी उचलली. ती किंमत बघतेय तोवर त्या पिशवीतून मिठाची धार सुरु झाली . रोखीचे आसन, गणनयंत्र, पैसॆ आणि स्वतः ती रोखी मिठाने शुचिर्भूत झाली. 
     रोखीचे ताडताड वाक्ताडन सुरु झाले . आगीत लाह्या तडतडाव्यात तशी तिची मुक्ताफळे उसळू लागली . ' दिसत नाही का ? फुटकी पिशवी कशाला आणली ? कुठून कुठून लोक येतात . ' 
     ती बाई बापडी गप्प बसली . पैसे देऊन चालू लागली . गलेलठ्ठ पगार खाऊन फुगलेली रोखी .  तिला काळवेळ समजलाच नाही . गिऱ्हाईक देवता असते हे उमगलेच नाही . म्हणूनच असेल कदाचित, देवाने 
सहकार भांडाराची दृष्ट काढली .    

Sunday, May 11, 2014

१२० पारीजातालाही दुखते तर !

                       
                 १२०  पारीजातालाही दुखते तर !

     श्रावणी आदितवार . आज आई रविवार पूजणार . फुले सगळ्या तरेची लागणार . पारिजात मात्र हवाच . तोच प्रमुख ना . पारिजात भरपूर जमवायचा आज . 
     घराला स्पर्शून पारिजात उभा . अर्धी फुले घरावर व अर्धी जमिनीवर पखरणारा . त्याचा आजचा सडा काही औरच होता . शुभ्र धवल पाकळ्या मधून रेखलेली देठांची ती भगवी नक्षी सादोळशेच्या त्या भगव्या मातीशी स्पर्धा करणारी . 
     एक पारजत उचलला . त्याला मातीचे कण लागलेले . पहाटे कधीतरी पावसाचा शिडकावा आलेला दिसतोय . चला आता नेहमीप्रमाणे घरावर . चढलो झाडावर . बुळबुळीत झालेल्या कौलांवर पाय टेकला . एक हात फांदीला आणि एक हात पारिजात वेचायला . 
     फुलामागून फूल . परडी भरू लागली . आणखी हवा पारिजात . पन्हळावर जायचे . कमी बुळबुळीत तो . हळुवारपणे हात सोडला फांदीचा . पाय ठेवला पन्हळावर . हा आता बिनधास्त . एका हातात परडी आणि दुसऱ्या हाताने वेचणी . 
     झाले  आता आणखी एकच फूल टाकायचे . आणि आणि सुळूक धाड ! हात झटकत उभे राहताना जाणवले . दाणकन आपटलोय जमिनीला . हातातल्या परडीसकट ! 
     चंद्रशेखर गोखलेची ' असा मी ' मधील चारोळी आठवली . 

झाडावरून प्राजक्त ओघळतो 
त्याचा आवाज होत नाही . 
याचा अर्थ असा नाही की 
त्याला इजा होत नाही . 

Friday, May 2, 2014

११९ नेम चुकला नसता तर !

                                    ११९ नेम चुकला नसता तर !

  ' लहानपण देगा देवा , मुंगी साखरेचा रवा ' असे मोठी माणसे खुशाल म्हणोत . पण लहान मुलांना मात्र नेहमी लवकर मोठे व्हायचे असते . याचे एक प्रमुख कारण म्हणजे नियम . ' असे करा , तसे करू नका ' म्हणत मोठ्यांनी लादलेले अनंत अविरत नियम . अक्षरशः कंटाळा यावा इतके तयार तत्पर नियम . 
     शस्त्र माणसावर रोखू नये हा असाच एक नियम . साधी सुरी जरी समोरच्यावर उचलली तर ती आधी जमिनीला लावली पाहिजे . मगच तिचा वापर करायचा . जोपर्यंत शस्त्राचा जमिनस्पर्श तोपर्यंत त्याचा वापर नाही . आणि लहानपण हे, हे नियम काटेकोरपणे पाळण्याचे . 
     स्वातंत्य्रापूर्वीचा काळ . शस्त्रांचे प्रचंड आकर्षण . सगळे जमले होते . रायफली बघत होते, हाताळत होते . एकाने रायफल उचलली . नेम धरत डॉक्टर हेडगेवारांवर रोखली . डॉक्टर म्हणाले, ' अरे शस्त्र असे माणसावर नाही रोखायचे . रिकामे असले तरीही . बाजूला कर ते ! ' 
     मित्रमंडळीत ऐकायचे थोडेच असते ! त्या माणसाने चाप ओढला . ' ठो ' आवाज झाला आणि गोळी उडाली . डॉक्टरांच्या कानाजवळून गेली होती ती . त्या भरलेल्या बंदुकीचा नेम चुकला नसता तर !!!!!

Wednesday, March 12, 2014

११८ धुंदी कळ्यांना , धुंदी फुलांना !

                              ११८  धुंदी कळ्यांना , धुंदी फुलांना !

नाही ! पण आज भामेने भांडायचे ठरवलेच होते . भामाच ती ठरविले म्हणजे ठरविले . अर्धा दिवस तरी वाया जाणे आता निश्चित . चल लेका लग्न केलेय ना भोग आता ह्या भांडणाचा योग . 
     नारदमुनींनाही बरोब्बर दिसला तो पारिजात . झाड आणि पडलेली फुलेही . काय आवश्यकता होती सत्यभामेला सांगायची की, पारिजात फुले रुक्मीणीला देतो म्हणून ! चोवीस तास नाकाच्या शेंड्यावरच्या लवेच्या टोकावरती सवतीमत्सर बाळगणारी ती . गप्प थोडीच राहील ? 
     असू दे.  केव्हा ना केव्हा तरी हा प्रसंग येणार होताच . आता आला . बस लेका आता तो सोडवत . 
     देवांनी किती प्रेमाने हा स्वर्गीय वृक्ष मला दिला . घरी आल्यावर लक्षात आले . देवांना विजय मिळवून दिल्यावर स्वर्गातील युद्ध संपले . माझ्या घरातील महायुद्धाची नांदी करीत . करणार काय ? काढली युक्ती ! पारिजातक लावला सत्यभामेच्या अंगणात ! भामा खुष ! प्रेम चिंब चिंब भिजलेले ! दवबिंदी हिरवळीवर पदरव उमटावा ना अगदी तसाच ! पारिजातकी ! कधी संपूच नये असे वाटणारे !
     पिसासारखा हवेवर तरंगत तरंगत गेलो रुक्मिकडे ! बघतो तर ती फुरगटून बसलेली . हा हा हा ! जरा बाहेर ये अंगणात आणि मग रुस सखे . अग ये तर खरी ! रुक्मिणी आपल्या अंगणात आली आणि बघते तर काय ! पारिजात !  पारिजात ! आणि पारिजात ! स्वर्गीय पुष्पांनी अंगण भरून गेलेले . धुंद करणारा तो ईश्वरी परिमल आणि तसाच धुंद पारीजाती परिसर . धुंदी कळ्यांना , धुंदी फुलांना !!!!!

Wednesday, February 19, 2014

११७ चिमणी आमच्या कुटुंबाचा भाग

                        ११७ चिमणी आमच्या कुटुंबाचा भाग    

 काल संध्याकाळी कवठेकरांकडे गेलो . ' युगप्रवर्तक ' चा विषय करायचा होता . घंटी वाजविली . वहिनीनी दार उघडले . कवठेकर स्वागत करीत म्हणाले, ' या या . ' मंद प्रकाशात ते बातम्या बघत होते .  अनौपचारिक गप्पा झाल्या . मुख्य विषय झाला . निरोपाच्या  गप्पा  करता करता त्यांनी बैठक खोलीतील मंद प्रकाशाचे रहस्य सांगितले . 
     ' ती ट्युबलाईट बघितलीत का ? लक्षपूर्वक बघा . नलिकेमागच्या पट्टीत काही दिसतेय का ? 
     एक छोटीशी चिमणी तिथे आरामात बसलेली दिसत होती . ' वाव्व , चिमणी आणि रात्री ? ' नकळत उद्गारलो . 
     कवठेकर सांगू लागले, ' गेला एक महिना झाला . हि चिमणी आमच्या कुटुंबाचा भाग बनून राहिली आहे . संध्याकाळी येते, त्या जागेत मस्त राहते आणि सकाळी निघून जाते . मात्र एक दुसऱ्या कुणालाही येऊ देत नाही . आपण दारा खिडक्यात बसते आणि इतरांना अक्षरशः हाकलून लावते . '
     आणि याचसाठी गेले महिनाभर ट्युबलाईट बंद ठेवतो आहे .
 

Sunday, February 16, 2014

११६ ' मला तेजस्वी पुत्र व्हावा '

                      कथा विवेकानंद - ११६

     भुवनेश्वरीदेवी नित्यपूजा आटोपून ध्यान करायला बसली . मनाच्या एका कुठल्यातरी कोपऱ्यात इच्छा होतीच ' मला तेजस्वी पुत्र व्हावा ' जबरदस्त इच्छा असली ना की, ती पुरी होत असते . 
     आणि त्या दिवशी तसे झालेही . ध्यान करता करता भुवनेश्वरी देवीसमोर साक्षात देवाधिदेव महादेव उभे राहिले . हळूहळू त्यांनी बालरूप घेतले आणि ते देवींच्या अंकावर येउन बसले . त्रिभुवनेश्वरि देवींची समाधी भंग पावली . मात्र एका दिव्य आकांक्षेला जन्म देऊन . 
     पौष कृष्ण सप्तमी १२ जानेवारी १८६३ . मकरसंक्रांतीचे पुण्यपर्व .  सकाळी सहा वाजून तेहेतीस मिनिटांनी त्रिभूवनेश्वरीदेविनी तेजः पुंज बालरत्नाला जन्म दिला . भगवान महादेवाचा प्रसाद म्हणून साहजिकच त्याचे नाव ठेवले गेले ' वीरेश्वर ' आईचा लाडका ' बिले '