Sunday, February 2, 2025

१६३ हत्ती मात्र हत्ती सारखाच

 १६३   हत्ती मात्र हत्ती सारखाच


गावामध्ये हत्ती आला. सगळेजण हत्ती पाहायला जाऊ लागले. त्यानी केलेल्या वर्णनामुळे गावातले वातावरण हत्तीमय होऊन गेले.

त्या गावात ६ दृष्टिहीन (आंधळे) रहात होते. त्यांनाही हत्ती पाहायला जायची इच्छा झाली.  त्यांनी मार्गदर्शक ठरविला. 

मार्गदर्शक वाटाड्याने त्यांना हत्तीकडे नेले आणि हत्ती सभोवती रिंगण करून गोलाकार उभे केले. त्यांना हत्तीला हात लावून स्पर्शाने हत्ती बघायला सांगितले. त्यांनी चाचपडत स्पर्श करीत, हत्ती बघायचा आनंद लुटायला सुरुवात केली. 

घरी परत आल्यावर ते आपापसात बोलू लागले.

 पहिला म्हणाला, " हत्ती खांबासारखा आहे. "

 शेपटीला हात लावलेला दुसरा म्हणाला,  " हत्ती केरसुणी सारखा आहे. "  

पोटाला हात लावत तिसरा उद्गारला, "तुम्ही चुकता आहात.  हत्ती आकाशासारखा विशाल आहे." 

चौथा म्हणाला, " अहो, हत्ती सुपासारखा आहे. " कानाला हात लावलेला माणूस म्हणत होता. 

 " हत्ती शिंगासारखा आहे. " दांत कुरवाळलेला बोलत होता. 

सहावा ज्याला सोंड सापडली तो म्हणाला, " तुम्हाला काहीच समजत नाही. " हत्ती बांबू सारखा आहे. "

 प्रत्येक जण आपल्या प्रचितीप्रमाणे हत्तीचे वर्णन करीत होते. हत्ती मात्र हत्ती सारखाच होता.

१६१ ओम यज्ञमिळे पुरोहितं

                     १६१   ओम यज्ञमिळे पुरोहितं


शास्त्रज्ञांनी मुद्रण यंत्राचा शोध लावला. सगळे आनंदित झाले. ध्वनी आता पकडता येईल.

जेव्हा पाहिजे तेव्हा ऐकता येईल. पुन्हा पुन्हा ऐकता येईल. एक उपलब्धी प्राप्त झाली.

या अनोख्या यंत्राचा शुभारंभ करायला कोणाला बोलवायचे ? चर्चा झाली. आणि एकमताने

नाव ठरले पं. मोक्षमुल्लर.

 

शुभारंभी ध्वनिमुद्रण ! सगळी तयारी झाली. पं. मोक्षमुल्लर उभे राहिले. यंत्राची कळ दाबली

गेली. आणि त्यांनी म्हणायला सुरुवात केली. अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजं | 

होतारं रत्नधाततम ||  '

काही ओळी म्हटल्यानंतर उच्चारण संपले. त्यांनी खूण केली. मुद्रण थांबले.

 

सगळे शास्त्रज्ञ जमा झाले. त्यांनी पंडितजींना विचारले हे तुम्ही काय म्हटले ? पंडितजी

म्हणाले, ' याना ऋचा म्हणतात. हिंदुस्तानांत असलेल्या जगातील आद्य साहित्य  वेदातील

ह्या ओळी आहेत. गुणांची कदर असलेले ते शास्त्रज्ञ उठून उभे राहिले. आदराने त्यांनी त्या

 मुद्रणाला व पंडितजींच्या समय सुचकतेला नम्र प्रणाम केला. टाळ्यांचा कडकडाट केला.


१६२ एकसारखी असतात ती गाढवे

                                १६२  एकसारखी असतात ती गाढवे


डा सर्वपल्ली राधाकृष्णन इंग्लंडच्या दौर्र्यावर गेले होते

राष्ट्रपतींच्या सन्मानार्थ रात्री भोजचे आयोजन करण्यात आले होते

लंडनमधील सभ्य, तथाकथित प्रतिष्ठित लोकांना आमंत्रण होते

 

स्वागत, ओळख, भाषणे होऊन भोजनाला सुरुवात झाली

एक तथाकथित सभ्य गृहस्थ त्यांच्या जवळ आले

साळसूदपणाचा आव आणीत ते राष्ट्रपतींना म्हणाले,

" तुमचा भारत जरा विचित्रच आहे नाही ?

रंग, पोषाख, पंथ, खानपान सगळे वेगवेगळे ! भाषाही निरनिराळ्या !

आम्ही इंग्रज बघा कसे आहोत ! एकसारखे ! "

 

भारताचे राष्ट्रपती ते ! कमीत कमी दीड डझन भाषांचे जाणकार !

वाच्यार्थ, व्यंग्यार्थ याचबरोबर ध्वन्यार्थही बरोब्बर जाणणारे !

एक सेकंद ते थांबले, त्या वाचाळ आगंतुकावर नजर रोखीत ते उद्गारले,

" बरोबर आहे, घोडे वेगवेगळेच असतात ! एकसारखी असतात ती गाढवे ! "


१६० मी माझ्या भाषेवर प्रेम करतो

              १६०  मी माझ्या भाषेवर प्रेम करतो


राममनोहर लोहिया आपला प्रबंध लिहीत होते

त्यांचे मार्गदर्शक होते जर्मन सद्गगृहस्थ प्राध्यापक जुंबाई

पहिल्या दिवशीचा प्रसंग ! लोहिया श्री जुंबाईकडे गेले

आपल्या संशोधनाचे सारांशकथन ते त्यांना इंग्रजीमधून करु लागले

जुंबाई लोहियांना म्हणाले, " मला इंग्रजी येत नाही "

 

राममनोहर लोहियांनी जर्मन भाशा शिकायचे ठरविले

लोहियाच ते, थोड्याच दिवसात त्यांनी जर्मन आत्मसात केली

ते जुंबाईकडे गेले, आपल्या प्रबंधाचे सारांशकथन त्यांनी जर्मनमधून सुरू केले

प्राध्यापक जुंबाईनी लोहियांना मध्येच थांबविले

ते म्हणाले, " तू इंग्रजीमधून सांगू शकतोस , मला इंग्रजी येते "

लोहिया त्यांच्याकडे आश्चर्याने बघू लागले, ! प्राध्यापक म्हणाले,

" माझी जर्मन सगळ्यांनी शिकावी असे मला वाटते

मी माझ्या भाषेवर प्रेम करतो "


१५९ मी हातावर विद्येची रेषा मारली

                        १५९   मी हातावर विद्येची रेषा मारली


शाळेत भाषेचा तास होता, शिक्षक शिकवीत होते

नेहेमीप्रमाणे त्याची मार खाण्याची वेळ आली

एकवेळ देवाच्या माथ्यावरील फ़ूल चुकेल, पण त्याचा मार काही चुकणार नाही !

' ' ना तो, त्याने हात वर केला

 

शिक्षक हातावर काठी मारणार इतक्यात त्यांचे लक्ष त्याच्या तळहाताकडे गेले

" हात तेरे ! तुझ्या हातावर तर विद्येची रेषाच नाही !

तू आणी कसा शिकणार ? " शिक्षक उद्गारले !

सहसा न बोलणारा तो विद्यार्थी म्हणाला, " गुरुजी विद्येची रेषा कुठे असते हो ? "

" हि ह्या इथे, अशी असते ती ! " शिक्षक म्हणाले

 

आणी अकस्मात वादळाच्या गतीने तो मुलगा पळाला !

पाचच मिनिटात विजेच्या वेगाने तो परतलाही, रक्ताने माखलेला हात घेऊन !

" काय झाले ? " आश्चर्याने शिक्षकांनी विचारले

निश्चयाने उतू जाणार्र्या तेजस्वी डोळ्यांनी शिक्षकांकडे बघत मुलगा म्हणाला,

" मी हातावर विद्येची रेषा मारली !


१५८ मी सरकारी मदतीवर ठोकर मारतो

                 १५८  मी सरकारी मदतीवर ठोकर मारतो


स्वामी श्रद्धानंदानी गुरुकुलाची स्थापना केली

शिक्षण, शिक्षक, वास्तू सगळ्याच बाबतीत अप्रतीम !

इंग्रजांच्या पोटात दुखणे, त्यांच्या स्वभावाला धरूनच होते

गुरुकुलाला अनुदान देण्याचा प्रस्ताव इंग्रजांनी समोर ठेवला

स्वामीजीनी प्रस्ताव नाकारला, ते म्हणाले,

" अनुदान स्वीकारल्यास गुरुकुल इंग्रज धार्जिणे बनेल "

 

इंग्रजांनी दुसरी चाल रचली

एकोणीसशे सहा साली लार्ड चेम्सफ़ोर्ड यांनी गुरुकुलाला भेट दिली

साखरेने मढविलेल्या सोनेरी सुरीसम शब्दांत त्यांनी मदत देऊ केली

दिल्लीश्वरांसमोर गोंडा घोळण्याच्या त्या काळांत, स्वाभिमानाने स्वामिजी उद्गारले !

" मी सरकारी मदतीवर ठोकर मारतो ! "


१५७ मी लोटा घेऊन फ़िरतोय

                                   १५७  मी लोटा घेऊन फ़िरतोय


एकदा एक माणूस वैद्याकडे गेला व म्हणाला,

" माझ्या म्हशीला बद्धकोष्ठ झाला आहे, काही उपाय करा, गोळ्या द्या ! "

वैद्याने चार गोळ्या दिल्या

" ह्या द्यायच्या कशा ? " माणूस उद्गारला

वैद्य म्हणाले, " एक पोकळ नळी घे, ती म्हशीच्या तोंडात घाल

त्यांत गोळ्या ठेव व एक जोरदार फ़ूंक मार ! "

 

चार दिवसांनंतरचा प्रसंग ! तो माणूस पुन्हा आला

काठी टेकीत टेकीत ! कण्ह्त, कुंथत !

वैद्य म्हणाले, " काय झाले ? "

तो सांगू लागला, " तुम्ही सांगितल्या प्रमाणे केले

नळी म्हशीच्या तोंडात ठेवली, त्यांत गोळ्या ठेवल्या आणी

मी फ़ूंक मारायला तोंड उघडले इतक्यात म्हशीनेच फ़ूंक मारली

गेले चार दिवस मी लोटा घेऊन फ़िरतोय !


१५६ भारत हा सत्यधर्माचा सागर

                                 १५६   भारत हा सत्यधर्माचा सागर



भारतावर इंग्रजांचे राज्य सुरु झाले

हे राज्य दीर्घ काळ करायचे असेल तर इथे धर्मांतर करायला हवे

मोठ्या प्रमाणात मिशनरी ब्रिगेड्स भारतात आणण्यात आल्या

रेव्हरंड आवर पुण्यात आले, धर्मांतराचा धडाका सुरु झाला

लोक सैतानाच्या तावडीतून भराभर मुक्त होऊ लागले

 

मुळावरच घाव घालू , पुण्यातील एका विद्वानाच्या घरी आवर गेले,

पाश्चिमात्यांची स्तुती पौर्वात्यांची निंदा त्यांनी सुरु केली

थोडा वेळ जाऊ दिल्यावर पुण्याचे विद्वान म्हणाले

" आपण इथल्या संतसाहित्याचा अभ्यास केलाय का ?

आपल्याला मराठी येते का ?

ती थोडी शिकून घ्या ! नंतर बोलू आपण "

 

आवर मराठी शिकले, संतसाहित्याचा अभ्यास करू लागले !

आकाशातल्या बापदूतांच्या प्रमुखांना पत्र लिहिलेय त्यांनी

' भारत हा सत्यधर्माचा सागर आहे, इथे कसले मिशनरी धाडतां !

त्यांची खरी गरज ख्रिश्चनांनाच आहे '

आपली जीवनभराची कमाई, आठ लाख रुपये त्यांनी,

भारतीय संशोधन मंडळाला देऊन टाकले !

१५५ तुम्ही नवे रामायण रचाल

                              १५५   तुम्ही नवे रामायण रचाल !


नागपुरातील प्रसिद्ध महाविद्यालयाचा वार्षिक दिन होता.

प्रमुख पाहुणे म्हणून भगिनी निवेदिताना बोलाविण्यात आले होते.

उत्साहाने उतू जाणारी तरुणाई आणि तशीच तेजस्वी पाहुणी !

 

पहिल्या दिवशी क्रीडा सामने होते.

क्रिकेट, हॉकी.. वगैरे खेळांच्या स्पर्धा झाल्या.

फाड्फाड इंग्रजीत त्यांचे निवेदनही

 

बक्षीस समारंभात बोलताना भगिनी निवेदिता म्हणाल्या......

'' हे भारतातले तारुण्य आहे काय ?

काय हि माकडाप्रमाणे नक्कल !

हे तुमचे खेळ, हि तुमची भाषा आहे काय ?

मला आधी कळले असते तर मी आलेच नसते.

स्वतःच्या मध्ये लपलेली प्रतिभा दाखवा.

तुम्ही नवे रामायण रचाल !

१५४ नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा

                        १५४  नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा !


मोठ्या धुमधडाक्यात कार्यक्रमाची तयारी चालली होती.

संस्कृतची जननी असलेल्या भारतातून मोठे पंडित येणार !

तीन दिवस त्यांच्या पांडित्याचा लाभ सर्वाना मिळणार !

प्राचीन देव वाणीत सगळे न्हाऊन जाणार !

सर्वांचा उत्साह उतू जात होता !

 

जर्मनी मधले मोठे शहर .

कार्यकर्ते पंडितांना आणायला विमानतळावर गेले.

सूट, बूट, टाय घातलेल्या व्यक्तीला पाहिल्यावर मनात किंचीतशी शंका डोकावली.

पण कदाचित युरोपातील थंडीमुळे असेल, कार्यकर्त्यांनी मनाला समजावले.

 

कार्यक्रम सुरु झाला. पाहुण्यांची भाषणाची वेळ आली.

संयोजकांनी चतुर्वेदिंचा परिचय करून दिला.

' पाहुणे भारतातील मोठे पंडित आहेत.

ते चारही वेदांचे जाणकार असल्यामुळे,

त्यांचे नावच मुळी चतुर्वेदी असे पडले आहे. '

 

चतुर्वेदी उभे राहिले, ' समोरील संस्कृत जाणकारांना इंग्रजीतून संबोधित करीत ते म्हणाले.

' मला संस्कृत भाषेविषयी काहीच माहित नाही.

मी तिला मृत भाषा मानतो. '

काहीतरी थातूर मातुर बोलत ते खाली बसले.

 

कार्यकर्त्यांना गफलत लक्षात आली.

पाहुण्यांचा अपमान  न करता त्यांनी एक केले.

ताबडतोप  परतीच्या विमानाचे तिकीट त्यांच्या हाती दिले.

१५३ सूर्य तुर्की भाषेत उजाडला

                       १५३  सूर्य तुर्की भाषेत उजाडला


तुर्कस्थान तेव्हा नुकताच स्वतंत्र बनला होता.

केमाल पाशाचा पराक्रम होता तो.

एके दिवशी त्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली.

तो म्हणाला, ' आपल्याला राष्ट्रभाषा या विषयावर निर्णय घ्यायचा आहे.

सरकार, कायदा, शिक्षण विषयक पुस्तके तुर्की भाषेत आणायची आहेत.

भाषांतर करायला तुम्हाला किती वेळ लागेल ? '

अधिकाऱ्यांनी उत्तर दिले, ' पूर्ण दोन वर्षे लागतील. '

केमाल पाशांनी एक दीर्घ श्वास घेतला.

उपस्थितांवर आपली नजर रोखली.

' आज रात्री बारा वाजता तुमची दोन वर्षे पूर्ण होतील. ' ते म्हणाले.

दुसऱ्या दिवशी तुर्कस्थानचा  सूर्य तुर्की भाषेत उजाडला !


१५१ गरुडाचे मतदान

                                   १५१   गरुडाचे मतदान 


अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट  आहे हि. हिमालयातील प्रसिद्ध मानसरोवर काठची.

मानसरोवरात  काही राजहंस राहत होते. ऋषीची सामगायने  ऐकावी,

पक्षांचा कलरव प्राशन करावा, नीरक्षीर विवेक बाळगीत आनंदाने कालक्रमणा करावी.

एके दिवशी त्या सरोवरात एक कावळ्यांचा झुंड आला. कावळेच ते,

आपल्या कलकलाटाने त्यांनी त्या सरोवराची शांती भंग केली.

कावकाव, सगळीकडे घाण, अस्वच्छता . हंसांना आला राग.

त्यांनी कावळ्यांना ती जागा सोडून जायला सांगितले.

कावळे ऐकायला तयार होईनात . ते लोकशाहीची भाषा करायला लागले.

मतदानाची भाषा बोलू लागले.

झाले मतदानाचा दिवस उजाडला.एक एक पक्षी एक एक पान आणून टाकू लागला.

निकाल ठरलेलाच  होता. कावळ्यांची पाने जास्त झाली.

राजहंस दुखी अंतःकरणाने  आपले पिढ्या पिढ्यांचे  मानसरोवर सोडून निघाले.

वाटेत त्यांना गरुड भेटला. हंस दुखी पाहून गरुडाने चौकशी केली.

हंसांनी सगळी हकीकत सांगितली. गरुड म्हणाला या कावळ्यांची अशी हिम्मत.

चला सगळे. गरुड हंसांना  घेऊन पुन्हा मानसरोवराकाठी  आला.

तो कर्णकर्कश  गोंगाट ऐकून गरुड चिडला. त्याने एकच गर्जना केली.

मग काय, कावळ्यांचा वरचा श्वास वरच राहिला. जीवाच्या आकांताने जे ते 

पळाले ते पुन्हा तिथे  येण्यासाठीच.


१५२ व्यघ्रति इति व्याघ्रः

                                         १५२  व्यघ्रति इति व्याघ्रः 


सकाळची वेळ होती. पाणिनी व्याकरणाची साधना करीत होते. व्याघ्र ( वाघ )

या शब्दाची व्युत्पत्ती काय  असावी बरे ? वाघ रानात राहतो. एका शिष्याला

बरोबर घेऊन ते रानाच्या दिशेने चालू लागले. साधारणतः एकटा राहणारा हा

वाघ मला भेटेल का ? शोध सुरु झाला. मनात चिंतन चालू  झाले.  

आणि अकस्मात वाघ समोर आला. पाणिनी वाघाचे निरीक्षण करू लागले. व्याघ्र

शब्दाची व्युत्पत्ती शोधू लागले. वाघ जमीन हुंगत हुंगत पुढे चालला होता. पण वाघ वाघ होता. जनावराचा मार्ग  त्याला पक्का माहित होता. त्याने पाणिनीवर  झडप घातली. 

शिष्याला ' व्यघ्रती इति व्याघ्रः ' वाघ शब्दाची

व्युत्पत्ती सांगताना  पाणिनी आपला व्याकरण शास्त्रज्ञाचा  धर्म पाळत होते. समोरच्या भक्ष्याला खाताना वाघ आपला जनावराचा पंथ पाळत होता.


Saturday, February 1, 2025

१५० शिवी त्याने हिब्रू भाषेत दिलीय

                  १५०  शिवी त्याने हिब्रू भाषेत दिलीय


इस्त्रायलचे राष्ट्राध्यक्ष गाडीने चालले होते.

रस्त्यावर मुलांचा खेळ चालला होता.

गाडीमुळे खेळात व्यवधान आले.

भडक डोक्याच्या एका मुलाने फाडकन एक शिवी दिली.

चालकाने गाडी थांबविली.

तो त्या मुलाला पकडायला धावणार.....

तोच राष्ट्राध्यक्षाने चालकाला थांबविले.

त्या मुलाला जवळ बोलाविले.

पाठीवर कौतुकाची थाप दिली.

आ वासलेल्या चालकाला तोंड मिटायला सांगत ते म्हणाले.

' मुलाने शिवी दिली हे चुकले,

पण अत्यानंदाची गोष्ट म्हणजे हि शिवी त्याने हिब्रू भाषेत दिलीय. '


१४९ शिर्डी प्रसंग

                                                                          १४९ शिर्डी प्रसंग 


एका प्रसिद्ध देवालयाला जाण्याचा प्रसंग आला . आम्ही सगळे विद्यार्थी . बरोबर एक स्थानिक मार्गदर्शक . तोही विद्यार्थीच . आमच्याच बरोबर शिकणारा .  
     आम्ही शहरात प्रवेश केला . रात्र बरीच झाली होती .  मार्गदर्शकाने एक हॉटेल बघितले . रात्रीचे साडेअकरा वाजले होते . आमचे सामान आम्ही लॉकर मध्ये ठेवले . सामुदायिक जागेवर झोपण्यासाठी गादी उशी घेतली आणि अंथरुणावर अंग टाकले . 
     डोळा लागतो न लागतो तोच मार्गदर्शक पुन्हा आला . त्याने चांगल्या हॉटेलची सोय केली होती . आम्ही गाद्या आवरल्या . लॉकर मधून सामान काढायचे होते . मालकाकडे किल्ल्या मागितल्या .  तो म्हणाला, ' आणि एका दिवसाचे भाडे द्या . ' 
     आम्ही प्रश्नार्थक नजरेने बघितले . अत्यंत कोरडेपणाने त्याने घड्याळ पुढे केले .  ' आमचा दिवस बारा वाजता बदलतो . ' तो म्हणाला . घड्याळ्यात साडेबारा वाजले होते .
     आम्ही एक शब्दही न बोलता एका तासासाठी दोन दिवसांचे भाडे दिले आणि बाहेर पडलो . ज्या देवावर त्याचे हॉटेल चालते त्याचा दिवस मात्र पहाटे बदलणार होता . 

१४७ तुम्ही करा वा मरा

                                      १४७  तुम्ही करा वा मरा 


महाराज आणि ब्रिटिश अधिकारी यांची चर्चा चालू होती . विषय होता ' भारतीय सैन्य पराक्रम असूनही मागे का पडते ' याची . तो ब्रिटिश अधिकारी महाराजांना म्हणाला आपण प्रत्यक्ष प्रयोग करून बघू.

राजवाड्याजवळचे  भले मोठे मैदान आणि त्याला लागूनच वाहणारी नदी . मैदानात भारतीय व ब्रिटिश सैन्याची एकेक तुकडी . 
राजाने  तुकडीला इशारा केला.  ' तेज चल  '  तुकडीने संचलन सुरु केले . एक दो एक दो . ते नदीच्या दिशेने चालत होते . एक दो एक दो . नदीचा काठ आला . दोघांनी मागे वळून बघितले . संचलन सुरूच . नदीकाठचा चिखल, पाणी, भिजणारे चामड्याचे बूट . चारपाच माना वळल्या . तरीही आज्ञा नाही . पाणी गुडघ्याला लागले, कंबर भिजली. पाण्याने मानेला स्पर्श करताच  सगळे वळले . अहो,  ' पीछे मूड  '  द्या.  
' वळा आता  ' तुकडी प्रमुख उद्गारला .  
 ब्रिटिश अधिकाऱ्याने आपल्या तुकडी प्रमुखाला इशारा केला . ' प्रचल  ' एक दो एक दो . ते नदीच्या दिशेने चालायला लागले . एक दो एक दो . नदीचा काठ आला . संचलन चाललेले . नदीकाठचा चिखल, पाणी, भिजणारे चामड्याचे बूट.  तरीही आज्ञा नाही . पाणी गुडघ्याला लागले, कंबर भिजली. पाण्याने मानेला स्पर्श केला . हनुवटी, तोंड, नाक. नाकात पाणी गेले आणि जोरदार आज्ञा अली.  ' अबाउट टर्न  ' 
नखनाकांत भिजलेले ब्रिटिश सैन्य आपल्या जागेवर येऊन उभे राहिले . 
ब्रिटिश अधिकारी राजाला बघत होता . राजा आपल्या सैन्याला. 
 

१४६ संघर्ष हेच जीवन

                                               १४६  संघर्ष हेच जीवन 


एका गावात एक शेतकरी रहात होता. तसा तो कष्टाळू, मेहनती. देवावर विश्वास असलेला. त्याची शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून. पाऊस कधी भरपूर पडे कधी सरासरी. उत्पन्न कधी चांगले कधी जेमतेम.
एके वर्षी पाऊस कमी पडला. शेतक-याला बराच फटका बसला. राग आला त्याचा देवाचा. त्याने देवाला प्रसन्न करायचे ठरविले. तो तप करायला लागला.
देव प्रसन्न झाला. ' भक्ता काय पाहिजे ते माग. ' देव म्हणाला. शेतक-याने हुशारी दाखविली. ' देवा मला ऋतुचक्र दे. ' तो म्हणाला.
देव उद्गारला, " तथास्तु "
पुढील वर्षी शेतक-याने शेत लावले. शेताला हवा तसा पाऊस, पाहिजे तसे हवामान. ऋतुचक्रच त्याच्या ताब्यात ना ! कधी नव्हे तसे अभूतपूर्व पीक. वा-यावर धान चौफेर डोलताहे.
शेतक-याने कापणी करायचे ठरविले. कापणी सुरू झाली. बघतो तर काय, कणसात आत दाणाच भरलेला नाही. शेतकरी लागला रडायला. त्याने देवाचा धावा केला. देव प्रकट झाला. शेतक-याने आपली व्यथा सांगितली. देव हसला आणि म्हणाला, " वत्सा, कष्ट केल्याविना फळ मिळते का कधी ? हातोडीचे घाव सोसल्याविना देव बनतो का कधी ? अागीत होरपळल्याशिवाय सोने चकाकते का कधी ? बेटा संघर्ष हेच जीवन आहे. "

१४५ मी माणूस जोडला

                                                                १४५  मी माणूस जोडला


     भारतीय स्वातंत्र्यानंतरचा काळ. गावातील शाळा. एक  उपक्रमशील शिक्षक मुलांना शिकवित होते. 
देशभक्तीचा पाठ शिकविताना त्यांनी मुलांना भारताचे एकेक मानचित्र दिले. ते म्हणाले, " मुलांनो, हे मानचित्र फाडा. त्याचे तुकडे तुकडे करा. "
मुलेच ती ! त्यांनी भराभर त्या मानचित्राचे तुकडे केले. आपल्या बाकावर पसरून ठेवले. 
शिक्षक म्हणाले, " वा, छान ! आता हे तुकडे जोडा. मानचित्र पुन्हा तयार करा. "  
मुले तुकडे जोडायला लागली. पण काही जमेना. 
मागच्या बाकावर बसणारा अष्टावधानी मुलगा उभा राहिला. शिक्षकांना म्हणाला, " गुरुजी, मी बनवले मानचित्र. " गुरुजींनी बघितले. " छान. " ते म्हणाले. 
त्या मुलाला वर्गासमोर उभे करीत गुरुजींनी विचारले, " कसे काय केलेस तू ? "  
मुलगा अभिमानाने म्हणाला, " गुरुजी, मानचित्राच्या मागे माणसाचे चित्र होते. मी माणसाला जोडले. मानचित्र तयार झाले. " 
मुलांकडे बघत गुरुजी म्हणाले, " मुलांनो, तुम्ही चांगले नागरिक बना. देश तयार होईल. देश म्हणजे देशातील माणसे. "

१४४ नमस्कार मूर्तीला

                                                                १४४  नमस्कार मूर्तीला 


सकाळ झाली. कुंभार नेहमीप्रमाणे अर्थार्जनाला बाहेर पडला. आज त्याला देवमूर्ती  बाजारात विकायला न्यायची होती. बऱ्याच परिश्रमाअंती मनाजोगी सुरेख मूर्ती त्याने बनविली होती. 
बाजारात जात असताना या सुंदर मूर्तीला बघून अनेक जण हात जोडीत, नमस्कार करीत. गाढवाला वाटे लोक आपल्याला नमस्कार करीत आहेत. ते मध्ये मध्ये छाती ताठ करून थोडा वेळ थांबे, नमस्कार घेई. 
कुंभार बाजारात पोचला. त्याने ती मूर्ती योग्य किमतीला विकली.   जीवनोपयोगी सामान घेऊन तो परतला. वाटेत काही मंडळी दिसताच गाढव छाती ताठ करून उभे राहिले. गाढव थांबताच मालकाने त्याकडे पाहिले. त्याला अंदाज आला. आपल्या हाती असलेल्या काठीचा एक जोरदार रट्टा त्याने गाढवाच्या पाठीत हाणला. "  मघाशी लोकांनी केलेले नमस्कार देवाच्या मूर्तीला होते. तुला नव्हते गाढवा ! "
गाढव पुन्हा न थांबता घराकडे परतले.