Saturday, February 1, 2025

१४९ शिर्डी प्रसंग

                                                                          १४९ शिर्डी प्रसंग 


एका प्रसिद्ध देवालयाला जाण्याचा प्रसंग आला . आम्ही सगळे विद्यार्थी . बरोबर एक स्थानिक मार्गदर्शक . तोही विद्यार्थीच . आमच्याच बरोबर शिकणारा .  
     आम्ही शहरात प्रवेश केला . रात्र बरीच झाली होती .  मार्गदर्शकाने एक हॉटेल बघितले . रात्रीचे साडेअकरा वाजले होते . आमचे सामान आम्ही लॉकर मध्ये ठेवले . सामुदायिक जागेवर झोपण्यासाठी गादी उशी घेतली आणि अंथरुणावर अंग टाकले . 
     डोळा लागतो न लागतो तोच मार्गदर्शक पुन्हा आला . त्याने चांगल्या हॉटेलची सोय केली होती . आम्ही गाद्या आवरल्या . लॉकर मधून सामान काढायचे होते . मालकाकडे किल्ल्या मागितल्या .  तो म्हणाला, ' आणि एका दिवसाचे भाडे द्या . ' 
     आम्ही प्रश्नार्थक नजरेने बघितले . अत्यंत कोरडेपणाने त्याने घड्याळ पुढे केले .  ' आमचा दिवस बारा वाजता बदलतो . ' तो म्हणाला . घड्याळ्यात साडेबारा वाजले होते .
     आम्ही एक शब्दही न बोलता एका तासासाठी दोन दिवसांचे भाडे दिले आणि बाहेर पडलो . ज्या देवावर त्याचे हॉटेल चालते त्याचा दिवस मात्र पहाटे बदलणार होता . 

No comments:

Post a Comment