१४४ नमस्कार मूर्तीला
सकाळ झाली. कुंभार नेहमीप्रमाणे अर्थार्जनाला बाहेर पडला. आज त्याला देवमूर्ती बाजारात विकायला न्यायची होती. बऱ्याच परिश्रमाअंती मनाजोगी सुरेख मूर्ती त्याने बनविली होती.
बाजारात जात असताना या सुंदर मूर्तीला बघून अनेक जण हात जोडीत, नमस्कार करीत. गाढवाला वाटे लोक आपल्याला नमस्कार करीत आहेत. ते मध्ये मध्ये छाती ताठ करून थोडा वेळ थांबे, नमस्कार घेई.
कुंभार बाजारात पोचला. त्याने ती मूर्ती योग्य किमतीला विकली. जीवनोपयोगी सामान घेऊन तो परतला. वाटेत काही मंडळी दिसताच गाढव छाती ताठ करून उभे राहिले. गाढव थांबताच मालकाने त्याकडे पाहिले. त्याला अंदाज आला. आपल्या हाती असलेल्या काठीचा एक जोरदार रट्टा त्याने गाढवाच्या पाठीत हाणला. " मघाशी लोकांनी केलेले नमस्कार देवाच्या मूर्तीला होते. तुला नव्हते गाढवा ! "
गाढव पुन्हा न थांबता घराकडे परतले.
No comments:
Post a Comment