Monday, February 18, 2013

कथा विवेकानंद १६

                १६. कसली आलीय शिवाशिव ?

     स्वामीजी भारत भ्रमणात होते. त्यांचा मुक्काम एका रेल्वे स्टेशनाच्या फलाटावर होता. साधूचा वेश बघून माणसे येत. आपल्या शंकांचे, समस्यांचे समाधान करून निघून जात. तोंडी प्रसिद्धीमुळे माणसांची रीघ लागे. स्वामीजी सर्वाच्या अडचणी सोडवीत.
     तीन दिवस झाले. सतत येणाऱ्या लोकांमुळे त्यांना काही खायलाही मिळेना, धड झोपायलाही मिळेना. स्वामीजींची कुचंबणा फलाटाच्या बाजूला बसून चपला दुरुस्त करणाऱ्या एका चांभाराच्या लक्षात आली.
     तो स्वामीजींकडे आला आणि म्हणाला, ' स्वामीजी, गेले तीन दिवस मी बघतोय. तुम्ही नुसते बोलत आहात. पोटात अन्नाचा दाणाही टाकलेला नाही. मी तुम्हाला थोडे पीठ, तेल आणून देऊ का ? इथे बाजूला शिजवून खाता येईल. मी अन्न आणून दिले असते, पण मी चांभार असल्यामुळे.....
स्वामीजी म्हणाले. " अजिबात नाही. पीठ वगैरे काही नको. मला घरून काही भाकऱ्याच आणून दे. मी साधू आहे. मला कसली आलीय शिवाशिव !
     तो चर्मकार स्वामीजींना आनंदाने वाढत होता. स्वामीजी जेवत होते. इतक्यात काही मंडळी आपल्या शंकांच्या समाधानासाठी तिकडे आली. स्वामीजी चांभाराच्या हातचे खातात, ते पाहून ते काहीबाही बोलू लागले.                         .    स्वामीजी हसले आणि म्हणाले, ' बाबांनो, गेले तीन दिवस मी तुमच्या प्रश्नांचे समाधान करीत आहे.एकालाही मला काही खायला द्यावेसे वाटले नाही. आणि माझी दया येउन हा सहृदयी माणूस मला काही देत आहे तर ते तुम्ही नाकारता आहात ? धन्य बाबा तुमची ! "


No comments:

Post a Comment