Wednesday, July 31, 2013

९४. ख्रिश्चनांवर विजय .

                      कथा विवेकानंद - ९४

     गोव्याला येण्यामागे  स्वामीजींच्या डोळ्यासमोर दोन  प्रमुख उद्देश्य   होते. पहिला देवदर्शन ! दक्षिण काशीतल्या देवतांचे दर्शन ! आणि दुसरा ख्रिश्चन मताचा अभ्यास! खंडन-मंडण यांची फार मोठी परंपरालाभलेल्या या देशात परमताचा विचारअभ्यास सहज केला जातो.
  स्वामीजी हाच प्रमुख उद्देश्य घेऊन गोव्यात आले होते. श्री. सुब्रायबाब नायकांशी आपला मानस त्यांनी  व्यक्त  केला. मडगाव पासून  किमी. अंतरावर  असलेल्या प्राचीन रायतूर किल्ल्याचे रुपांतर पोर्तुगीजांनी सेमिनारीत केले होते.  ख्रिश्चन मतप्रसार करणारे पंथप्रसारकपाद्री तेथे तयार केले जातात. तिथल्या ग्रंथालयात ख्रिस्ती पंथविषयक अनेक उत्तमोत्तम पुस्तके होती . अत्यंत दुर्लभ  अशी  प्राचीन  हस्तलिखिते होती. लेटीन ग्रंथ होते. या पुरातन  ग्रंथांमधून ख्रिश्चन पंथाचा इतिहास व तत्वज्ञान यांचा अभ्यास  करणे. गोव्यातील समाजमनावर  झालेला धर्मपरिवर्तनाचा प्रभाव जाणून घेणे आणि सात  किलोमिटरवर  जावून  मिळविलेल्या  माहितीच्या  आधारे  सात  समुद्रापलीकडे जाऊन अर्वाचीन हिदुत्वाची आश्वासक  सिंहगर्जना  करणे.
     स्वामीजी रायतूरला गेले. तिथल्या प्राचीन ग्रंथांचे ते अध्ययन करू लागले. हस्तलिखिते चाळू लागले. काही टिपणेही त्यांनी काढली. तेथील विद्यार्थीशिक्षकपादरीत्यांचे प्रमुख स्वामीजींना कुतुहलाने बघत. फुरसतीच्या वेळी त्यांच्याबरोबर वार्तालाप करीत. विविध प्रश्न विचारीत. स्वामीजीची वेशभूषाप्रगाढ ज्ञानतीव्र स्मरणशक्तीचौफेर व्यासंग यामुळे लोखंडाने चुंबकाला चिकटावे तसे सर्वजण आकर्षिले जात. शेकडो विद्यार्थी तिथे निवासाला असत. येशूच्या धर्माचे सार त्यांनी या विद्यार्थ्यासमोर ठेवले. एक भगवा संन्यासी येतो काय ! चारदोन पुस्तके चाळतो काय ! आणि वर्षानुवर्षे पंथ कोळून प्यालेल्याना त्यांच्याच पंथाचे मर्म सांगतो काय ! 

Tuesday, July 30, 2013

९३ . स्वामीजींनी दीक्षा दिली .

                       कथा विवेकानंद - ९३ 

     सौ. इंदुमती आणि श्री. हरिपद मित्र अनुरूप हिंदू दांपत्य .  गृहस्थी जीवन व्यतीत करतानाही आध्यात्मिकतेचा भाव मनी बाळगणारे . सौ . इंदुमतीच्या मनात गुरुमंत्र घ्यायची इच्छा होती . हरिपदांना आपली इच्छा तिने एकदा बोलून दाखविली होती . योग्य गुरु मिळाला तर आपण दोघेही दीक्षा घेऊ असे हरीपदांनी सांगितले होते . 
     स्वामीजींची भेट झाली . ते निवासाला घरी आले . त्यांचे जवळून दर्शन झाल्यावर दोघांच्याही इच्छांना गरुडाचे पंख फुटले . हरीपदांनी इंदुमतीला विचारले, ' स्वामीकडून दीक्षा घ्यायची काय ? ' तिने लगेच होकार दिला . 
     स्वामिजींशी बोलता बोलता हरिपदांनी विषय काढला . स्वामीजी म्हणाले, ' गुरु होणे ही अत्यंत कठीण गोष्ट आहे . कारण गुरूला शिष्याचा सर्व भार सहन करावा लागतो . शिवाय दीक्षा देणारा गुरु आणि घेणारा शिष्य यांच्या किमान तीन भेटी त्यापूर्वी घडून आल्या पाहिजेत . आणि एक संकेत आपण बाळगला पाहिजे . तो म्हणजे संसारी माणसांनी संसारी गुरू करावा हे चांगले . ' 
     मित्र दांपत्याने हट्टच धरला आणि स्वामीजींनी त्यांना दीक्षा दिली . 




९ २ . धर्माने संतोष निर्मिती होते .

                      कथा विवेकानंद - ९ २ 

     श्री . हरिपद मित्र हे बंगाली गृहस्थ . स्वामीजी आणि ते यांचे ग्रह जुळले . हरिपद स्वामिजींशी अनेकानेक विषयांवर चर्चा करीत . थट्टाविनोद करीत . निकोप चर्चेसाठी शेवटी विचारांचीही तार कुठेतरी जुळावीच लागते . 
     स्वामीजी शरीराने धष्टपुष्ट होते . कमाविलेले शरीर असल्याने खाल्लेले अन्न त्यांना पचे . त्याचा देखणा परिणामही त्यांच्या शरीरावर सर्वांगानी जाणवे . सदा संतुष्ट असल्याने ते विनोदीही होते . 
     हरीपदांनी त्याच्या या शरीरावरून त्यांना एक दिवस छेडलेच . ' संन्याशाचे शरीर का कुठे धष्टपुष्ट असते ? त्याला असे शरीर मिळणे शक्य नाही . ' 
     स्वामीजी उद्गारले, ' माझे शरीर हा माझा दुष्काळ निवारक फंड आहे . आठवडाभर जरी उपवास घडला तरी मला काही होत नाही . माझ्या अंगावर असलेली हि चरबी माझे व्यवस्थित पोषण करते . मला मरू तर ती अजिबात देत नाही . नाहीतर तुम्हा लोकांचे बघा . एकादशीचा एक दिवसाचा उपवास जरी केला तरी दुसऱ्या दिवशी पित्त चढते, चक्कर येते . आख्खे घर डोक्यावर घेता . बरोबर की नाही ?  जो धर्म माणसाच्या ठिकाणी संतोष निर्माण करू शकत नाही तो मुळी धर्मच नव्हे . '

Monday, July 29, 2013

९ १ . संन्याशाने एका जागी राहू नये .

                       कथा विवेकानंद - ९ १

     बेळगावच्या मुक्कामात स्वामीजींचा निवास भाटे वकिलांकडे होता . श्री . हरिपद मित्रांनी मोठ्या प्रयासांनी त्यांना आपल्या घरी आणले . धर्म, साहित्य, शिक्षण, मिशनरी प्रचार यावर सखोल चर्चा त्यांच्याकडे केली . स्वामीजींनी पुढील प्रवासास निघायचा विषय काढला . हरिपद सोडायला तयार होईनात . 
     स्वामीजी म्हणाले, ' संन्याशाने शहरात तीन दिवसांपेक्षा जास्त राहू नये . खेड्यात तर एकच दिवस . बेळगांव शहर असल्याने आता मला निघायला हवे . खूप दिवस झालेत . ' 
     हरिपद कसेच ऐकायला तयार होईनात . स्वामीजी म्हणाले, ' संन्याशी सगळेच त्याग करतो . स्वतःचे श्राद्ध सुद्धा करतो . त्याला मोह उत्पन्न होता कामा नये . या मायावी संसाराची माया निर्माण होता उपयोगी नाही . ' 





Thursday, July 25, 2013

९ ०. हायकोर्टाचा निकाल !

                    कथा विवेकानंद - ९ ० 

      भाटे वकिलांच्या घरी सगळे जमले होते . बेळगावातील त्या प्रतिष्ठित आणि विद्वान व्यक्तींशी स्वामीजी संवाद साधत होते . कोणी हिंदी भाषेत,कोणी संस्कृत भाषेत तर बहुतेकजण इंग्रजी भाषेत आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधत होते . स्वामिजीही कधी विनोदाने कधी थट्टेने तर कधी गंभीरपणे उपस्थित प्रश्नांची उत्तरे देत होते . 
     एकाने संस्कृत मध्ये प्रश्न विचारला, ' अमुक पुराणात सांगितले आहे की, म्लेंछ भाषेत धर्माची चर्चा करणे निषिद्ध आहे . ' स्वामीजींचे डोळे क्षणभर चमकले . ते म्हणाले, ' धर्मचर्चा करायला भाषेचे बंधन नाही . तुम्ही कोणत्याही भाषेतून धर्मचर्चा करू शकता . ' 
     वेदादिकातील अनेक दाखले देत ते पुढे म्हणाले, ' आपल्याला ठाऊक असेलच की पुराणांपेक्षा वेदांचेच म्हणणे श्रेष्ठ आहे . हायकोर्टाचा निकाल खालची न्यायालये नाकारू शकत नाहीत . ' 
      


Wednesday, July 24, 2013

८९ . त्यांना उलट वाईटच वाटेल .

                        कथा विवेकानंद - ८९ 

     स्वामीजी भाटे वकिलांकडे राहायला लागले . तरुण असूनही प्रचंड बुद्धिमान असलेल्या या संन्याशाची ओळख आपल्या बंगाली मित्राला करून द्यावी असे त्यांना वाटले . स्वामीजींना घेऊन ते हरिपद मित्रांकडे गेले . 
     श्मश्रू केलेला तेजस्वी संन्याशी, पायात कोल्हापुरी वहाणा, भगवी कफनी, डोक्याला फेटा असा देखणा युवक हरीपदांना क्षणभर भुरळच  पडली . ' साधू म्हणजे निश्चित काहीतरी मागण्यासाठी आलेले असावेत ' असा विचारही मनात येउन गेला . स्वामीजी बंगाली आहेत त्यामुळे महाराष्ट्रीय माणसाच्या घरी त्यांचे जमणे कठीणच . बहुधा याच साठी श्री . भाटे यांनी स्वामीजींना इथे आणले असावे . 
     हरिपदांनी स्वामीजींना विचारले, ' तुमचे सामान इथे आणवून घेऊ का ? ' स्वामीजी उद्गारले, ' सध्या तरी नको . वकिलांच्या घरात मी अगदी आनंदात आहे . आणि घरातील सर्वजण माझ्याशी प्रेमाने, अगदी घरच्यांसारखे वागत आहेत . आपण बंगाली म्हणून मी निघून आलो तर त्यांना उलट वाईटच वाटेल . ' 
     

८८ . केवळ, या सम हा !

                         कथा विवेकानंद - ८८ 

      बेळगावच्या सदाशिवराव भाटे वकिलांकडे स्वामीजींचा मुक्काम होता . प्रचलित पद्धतीपेक्षा वेगळ्या भासणाऱ्या या संन्याशाने भाटे वकिलांचे कुतूहल जागृत केले . इकडे तिकडे अशी स्वामीजींची थोडी चाचपणी करताच त्यांच्या लक्षात आले की हे पाणी थोडे वेगळे आहे . ते बुद्धिमानच नव्हे तर जिनियस आहेत . 
     थोडे अधिक खोलात जाण्याचा प्रयत्न त्यांनी केला . त्यांनी आपल्या मित्रांना पेयपानासाठी निमंत्रण दिले . स्वामींनी मित्रांना जिंकले . वकिलांनी विद्वानांना तसेच पुढाऱ्यांना बोलाविले . सगळ्यांनी एकमुखाने निर्वाळा दिला, ' केवळ, या सम हा ! ' 
     धार्मिक विषयावरील वादविवादाचा समारोप त्यांनी केला, ' हिंदू धर्म मृत्युपंथाला लागलेला नाही . आज जगाला आपल्या धर्मातील अमोल विचारांचा परिचय करून देण्याची गरज आहे . वेदांत हा नुसता संप्रदाय नाही . जगाला प्रेरणा देण्याचे सामर्थ्य या विचारात आहे . ' 


८७ . सवयी सुटतील आपोआप !

                      कथा विवेकानंद - ८७

     स्वामीजी बेळगावला आले . श्री . भाटे वकिलांकडे त्यांचा मुक्काम होता . स्वामीजी दिसायला तेजःपुंज, राजसी . बलदंड शरीरयष्टी, तेजस्वी पाणीदार डोळे . मोह पाडणारे दर्शन. इतर संन्याश्यांसारखे नव्हे . त्यामुळे अनेकांना कुतूहलमिश्रित आश्चर्य वाटे .      
     स्वामीजींशी बोलताना त्यांचे बुद्धीचातुर्य लक्षात येई . ते भाषाही बहुतेक इंग्रजीच वापरत . त्यामुळे रूढार्थाने दिसणाऱ्या साधुंपेक्षा स्वामीजी वेगळे भासत . जेवणानंतर ते विडा खात . पानसुपारी खायची त्यांची हि पद्धत, अन्य सवयीही अनेकांना खटकत असत, विचित्र वाटत असत . 
     एके दिवशी भाटेनी छेडलेच. स्वामीजी म्हणाले, ' संन्यास घेण्यापूर्वी मी एक आनंदी तरुण होतो . तत्वज्ञानाचे पदवी पर्यंत शिक्षण मी घेतले होते . जीवन जगण्याचेही माझे एक ध्येय होते . पण गुरूंच्या संपर्कात आलो आणि जीवनाची दिशा बदलली . आता काही पूर्वींच्या काही सवयी आहेत. त्या काही फारशा गंभीर नाहीत . सुटतील आपोआप !  

      
       

Tuesday, July 23, 2013

८६ . तिमिरात उगवलेला हा सूर्य आहे .

                      कथा विवेकानंद - ८६

     स्वामीजीचा मुक्काम चेन्नईमध्ये होता . एका निवांत क्षणी स्वामीजींनी गायला सुरुवात केली . ' इंद्र जिमी जंभ पर वाड वसु अम्भ पर रावन सदंभ पर रघुकुल राज है ' स्वामीजी तल्लीन होऊन गात होते . 
     एका शिष्याला हे गाणे आवडले नाही . तो स्वामीजींना म्हणाला, ' स्वामीजी, तुम्ही एका दरोडेखोराची स्तुती करता ? ज्या माणसाने रक्ताचे पाट वाहविले, शहरे लुटली, धन्याशी फितुरी केली, अत्याचार केले त्याची तुम्ही भलावण करता ? शिवाजी हा वाटमारी करणारा एक दरोडेखोर आहे . ' 
     स्वामीजीनी गाणे तत्काळ थांबविले . रागाने लालबुंद झाले ते . तीव्र शब्दात ते त्या शिष्याला म्हणले, ' काय बोलतोस तू ? आणि कोणाबद्धल ?
लाज वाटते मला तुझी ! या देशात अंधःकार पसरला होता . समाजाचे अधःपतन झाले होते . धर्म आणि संस्कृती विनाशाच्या दिशेने वेगाने चालली होती . सगळेच आपले कर्तव्य विसरले होते अशा  निराशेच्या तिमिरात उगवलेला हा सूर्य आहे सूर्य ! 
     आणि मला तुमची मजा वाटते .  शिकलेला इतिहास तुम्ही जशाचा  तसा खरा मानता . हा इतिहास परक्यांनी लिहिलेला आहे . आक्रमकांनी लिहिलेला आहे . सत्य हे आहे की, भारतीय ऋषी मुनी दास्यमुक्तीसाठी ज्या महापुरुषाची अनेक वर्षे वाट पाहत होते ते आहेत हे  शिवराय .  
 आधुनिक ऋषी नवा शिववेद सांगत होता . 
     


Monday, July 22, 2013

८५ . गर्दी माझ्या ध्येयमार्गातील अडचण .

                     कथा विवेकानंद - ८५ 

     लोकमान्य टिळक ही एक संस्था . त्यांचा अनेक संस्थांशी संबंध . अनेकानेक उपक्रमांमध्ये सहभाग . ' डेक्कन क्लब ' ही संस्था दर आठवड्याला एक निबंध वाचनाचा कार्यक्रम ठेवत असे . एकाने निबंध सादर करायचा नंतर मग सर्वांनी त्यावर चर्चा करायची . ' वादे वादे जायते तत्वबोधः '  
     टिळक स्वामीजींना घेऊन हिराबाग येथे या कार्यक्रमाला गेले . श्री . काशिनाथपंत नातू यांनी तत्वज्ञानावर निबंध वाचला . त्यानंतर वेळ चर्चेची . पण कोणी बोलायलाच तयार नाही . विषय थोडा उच्चस्तरीय .  पण सगळेच गप्प गप्प !  
     स्वामीजींना रहावले नाही . त्यांनी बोलायला सुरुवात केली . प्रतिपादित विषयाचे एकेक पदर उलगडीत ते पुढे जाऊ लागले . श्रोत्यांना त्या विषयोदकाने चिंब भिजवून टाकले . फिरत्या संन्याशाची अस्खलित भाषा, वक्तृत्व, प्रतिपादन हातोटी, व्यासंग सगळेच आश्चर्य चकित झाले .      दुसऱ्या दिवशी टिळकांच्या वाड्यात हि गर्दी . नेहमी जेवताना स्वामी व टिळक एकत्र असत . त्या रात्री स्वामीजींनी सांगितले, ' मी उद्याच पुणे सोडणार आहे . ही गर्दी माझ्या ध्येयमार्गातील अडचण आहे . '  दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे टिळक उठले . त्यांना समजले की स्वामीजीनी  भल्या पहाटेच पुणे सोडले आहे . 


८४ . वादपटुत्व !

                         कथा विवेकानंद - ८४

     स्वामी विवेकानंद रेल्वेने मुंबईहून पुण्याला निघाले . त्याच डब्यातून लोकमान्य टिळकही आपल्या चारपाच मित्रांसह आपल्या घरी पुण्याला चालले होते . मुंबईच्या शेठ रामदास छबिलदास यांनी तशी  स्वामीजी व टिळक यांची एकमेकांशी ओळख करून दिली होती . आपण एक संन्याशी एवढेच स्वामीजींनी सांगितले होते . 
     स्वामीजी खिडकीतून दिसणारा निसर्ग न्याहाळीत होते . व्यष्टी हा समष्टीचाच भाग असल्याने देशाटनात त्याचेही निरीक्षण आलेच . टिळकांचे मित्र विविध विषयावर चर्चा करीत होते . आपापले मत हिरीरीने नोंदत होते . 
     विषय संन्याशी या विषयावर घसरला . दोघेजण तर हळूहळू संन्याशांची टिंगल टवाळी इतपत खाली उतरले . स्वामीजींचे लक्ष त्या चर्चेकडे गेले . ते दोघेही साधूंना भोंदू , ऐतखाऊ, भिकारी, देशाची चिंता नसणारे अशी दुषणे देऊ लागले . 
     टिळक संन्याशांची बाजू मांडू लागले . पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते . शेवटी स्वामीजींनी चर्चेत भाग घेतला . इंग्रजी भाषेत अस्खलितपणे आणि मुद्देसूद आक्रमक संवादाने स्वामीजींनी त्या महाभागांना निरुत्तर केले . एका संन्याशाची भाषा, वक्तृत्व, वादपटुत्व पाहताना सगळे थक्क झाले होते . डोळे विस्फारून बघत होते . 
     

८३ . माझा नरेंद्र आकाश आहे.

                         कथा विवेकानंद - ८३

     कोलकात्यातील दक्षिणेश्वरी कालीमातेचे मंदिर होते . रामकृष्ण त्या मंदिराचे पुजारी झाले . साधा सरळ स्वभाव, आत्मशरण भोळी भावभक्ती असलेले रामकृष्ण . कालीमाता प्रसन्न न होती तर नवलच !
     रामकृष्णांची नरेंद्राशी भेट झाली . जणू जिवाशिवाची भेट . रामकृष्ण नरेंद्रमय झाले जणू  ! उठता बसता ते नरेंद्राची स्तुती करीत, गुणवर्णन करीत . काही जुन्या मंडळींना हे कौतुक सहन होईना . काय करावे बरे ?  
     रामकृष्णाजवळ नरेंद्राची चहाडी करायचा बेत काही जणांनी आखला . ते स्वामीजी जवळ गेले .  त्यांचे कान फुंकू लागले . नरेंद्र नोकरी करीत नाही . त्याला वाईट संगत लागलीय . तो व्यसनाच्या अधीन झालाय . त्याचा तोल सुटलाय . निराशाग्रस्त होऊन तो काहीही खातोय . अगदी गोमांस सुद्धा . ते सांगू लागले . 
     रामकृष्ण हसले आणि म्हणाले . ' माझ्या मित्रांनो आपण धूर बघितलाय काय ? भिंत काळी करणारा धूर . धूर फक्त भिंत काळी करतो . तो आकाश नाही काळे करू शकत ! आणि माझा नरेंद्र आकाश आहे आकाश ! ' 
     

Sunday, July 21, 2013

८२ . तू स्वतः महासागर झाला आहेस !

                        कथा विवेकानंद - ८२

     स्वामी विवेकानंद अमेरिकेत असतानाची गोष्ट . तेथील प्रख्यात गायिका मादाम काल्व्हे त्यांना भेटायला आल्या . ओळख झाली,चर्चा झाल्या,  मादाम काल्व्हे स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाने भारून गेल्या . 
     अशाच एका भेटीत मादाम काल्व्हे स्वामीजींना म्हणाल्या, ' मला उपदेश द्या. ' स्वामीजी म्हणाले, ' तुम्ही तुमचा ' स्व ' अनंतात विलीन करा. ' मादाम एकदम म्हणाल्या, ' नाही अजिबात शक्य नाही . असा विचारही करणे मला शक्य नाही . माझे ' मी ' पण मला हवे आहे . अनंतात विलीन होऊन जाणे मला आवडणार नाही . 
     स्वामीजी स्मित करून म्हणाले, ' पाण्याचा एक छानसा पिटुकला थेंब सागरात पडला . स्वातंत्र्याच्या अतीव लालसेने तो ओरडू लागला . ' मला एकटे रहायचेय . मला स्वतंत्र रहायचेय. ' तो विशाल महासागर हसला आणि म्हणाला, ' अरे, असा रडतोस कशाला ? आता तू तुझ्या भावा-बहिणी बरोबर मिळाला आहेस . या महान समष्टीचा घटक झाला आहेस . वेड्या, तू स्वतः महासागर झाला आहेस ! '  

८१ . तिखट मिरच्या मिळतील काय ?

                         कथा विवेकानंद - ८१ 

     स्वामी विवेकानंद संन्याशी होते . ते स्वतःला परमहंस म्हणत . सगळे सोडून दिलेला संन्याशी नव्हे . स्वतः जवळ काहीही न बाळगणारा अपरिग्रही साधू  . स्वामीजी वेगवेगळ्या पदार्थांचे शौकीन होते . पदार्थ ते मोठ्या आवडीने खात . मसालेदार पदार्थ त्यांची आवड होती . 
   स्वामीजी नुसते स्वतः खात नसत . गुरुबंधुना, शिष्यांना वाढण्यात त्यांना मोठा आनंद मिळत असे . स्वामीजी विविध पदार्थ आपण तयार करीत . पदार्थाचे, त्यातील गुणवैशिष्ट्यांचे वर्णन करीत शिष्यांना वाढीत . जे मिळेल ते साधूने खाल्ले पाहिजे . दात्याने वाढलेली भिक्षा स्वीकारलीच पाहिजे असे ते सांगत . 
     स्वामीजी स्वीत्झर्लंड मध्ये होते . मिरच्यांच्या तिखट पणाविषयी चर्चा सुरु झाली . मिरच्या आणण्यात आल्या . स्वामीजी त्या तिखटजाळ मिरच्या मोठ्या चवीने खाऊ लागले . चावून चावून त्यांचा आस्वाद घेऊ लागले . म्हणाले, ' यापेक्षा तिखट मिरच्या इथे मिळतील काय ? '  
     


Saturday, July 20, 2013

८० . श्री. नारायण गुरु

                      कथा विवेकानंद - ८० 

     स्वामी विवेकानंद भारत परिक्रमा करीत होते . प्रवासात बंगळुरुला त्यांनी डॉ. पन्यू यांच्याकडे मुक्काम केला . डॉ पन्यू सरकारी वैद्यकीय अधिकारी होते . बोलत असताना त्यांनी आपल्या मनातील वेदना स्वामीजींना बोलून दाखविली . 
     ते म्हणाले, ' त्रावणकोरमध्ये ब्राह्मणांचे वर्चस्व आहे . त्यामुळे डॉक्टरी पास करूनह मला नोकरी मिळाली नाही . ब्राह्मणांना प्रसन्न करण्याचा मार्ग कोणता ? '
     स्वामीजी डॉक्टरांना म्हणाले, ' तुम्ही कशाला ब्राह्मणांच्या नादाला लागता ? तुमच्या समाजातही चांगली, सत्चरित्र माणसे असतील ! त्यातील गुणी माणसाला पुढारी बनवा आणि पुढे चला . '
     डॉ. पन्यूनी स्वामीजींचा सल्ला मानला . त्यांना श्री. नारायण गुरु यांच्या मध्ये नेतेपदाचे गुण आढळले . श्री. नारायण गुरूंना त्यांनी गुरुपदी बसविले .  त्यांची सगळी जात नारायण गुरूंना आदर्श मानू लागली . त्यांचा आदेश पाळू लागली . श्री. नारायण गुरु हळूहळू मग साऱ्या समाजाचेच नेते बनले, प्रातःस्मरणीय झाले . 



Friday, July 19, 2013

७९. माणसाला अन्न देण्याची पद्धत

                  कथा विवेकानंद - ७९ 

     स्वामीजी एका सदगृहस्थाच्या घरी मुक्कामाला होते . वर्तमानपत्रात बातमी आली होती . ' कोलकात्यात एक माणूस उपासमारीने मेला . ' बातमी वाचताच स्वामीजी अस्वस्थ झाले . ते एकदम म्हणाले, ' हा देश रसातळाला जाणार . ' 
     ' असे आपण का म्हणता ? ' श्री. हरीपदांनी विचारले . 
     अरे, इतर देश आणि आपला देश यांच्यात फरक आहे . इतर देशात गरिबांना अन्न देणाऱ्या, काम देणाऱ्या अनेक संस्था आहेत . अनाथाश्रमांना लोक भरपूर पैसे देतात . आणि तरीही तिथे शेकडो लोक भुकेने मरत असतात . 
     आपल्या देशात तसे नाही . आपल्या देशात भुकेलेल्या माणसाला अन्न देण्याची पद्धत फार प्राचीन काळापासून आहे . त्यामुळे येथे कोणी उपाशीपोटी मरत नसत . आज अशी बातमी प्रथमच वाचली . आणि महत्वाचे म्हणजे या दिवसात दुष्काळही नाही . आपण आपली संस्कृती, आपला वारसा विसरून चाललोत काय ?

७८ . जनता जनार्दनाच्या सेवेसाठी

                    कथा विवेकानंद - ७८

     स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्माला सेवेचा स्पर्श दिला . आपल्या शिष्यांना त्यांनी जनसेवेचे व्रत दिले . त्यांच्यात सेवाभाव जागविला . सेवाभावी संस्थांची उभारणी केली .  त्या वाढविल्या . 
     भगवान गौतम बुद्ध त्यांचा आदर्श होता . येणाऱ्या काळात भारताला टिकाव धरायचा असेल तर सेवेची कास धरावी लागेल असे ते सांगत . 
     स्वामीजी अमेरीकेहून परतले . त्यांच्यासोबत मार्गारेट नोबल भारतात आल्या . भारतीयांची सेवा करायच्या अटीवरच त्यांना भारतात यायची अनुमती मिळाली . आपल्या सेवाभावाने नोबलनी स्वामीजींना प्रसन्न करून घेतले . 
     मार्गारेट नोबलचा दीक्षा समारंभ झाला. त्या भगिनी निवेदिता बनल्या . निवेदितेला दीक्षा दिल्यानंतर स्वामीजींनी त्यांना बोलाविले . त्यांच्या हातात काही फुले दिली . ते म्हणाले , ' हि फुले घे . तो बुद्ध दिसतोय ना, त्याच्या पायावर वाहा . त्या महात्म्याने आपले सारे आयुष्य जनता जनार्दनाच्या सेवेसाठी वाहिले होते . ' 

Thursday, July 18, 2013

७७ . बाटविणे शक्य झाले असते काय ?

                      कथा विवेकानंद - ७७ 

     स्वामी विवेकानंदांना सिन्हा नावाचे एक सदगृहस्थ भेटायला आले होते . हिंदू धर्मावर चर्चा चालली होती . चर्चा करताना स्वामीनी त्यांना अमेरिका प्रवासा दरम्यान घडलेले काही प्रसंग सांगितले . हिंदू धर्मावर टीका करताना ख्रिस्ती मिशनरी केवढ्या खालच्या पातळीवर येतात त्याचे वर्णन केले आणि विचारले, ' मला एक सांग . तुझ्या आईचा कोणी अपमान केला तर तू गप्प बसशील काय ? ' 
     सिन्हा म्हणाले, ' अजिबात नाही . उलट मी त्याला यथेच्छ बदडून काढीन . '
     ' एकदम बरोबर ! ' स्वामीजी म्हणाले . ' आता मला एक सांग . असाच भाव तुझ्या मनात आपल्या हिंदू समाजाविषयी असता तर ? आपल्या भावांचे हे जे ख्रिस्तीकरण चालू आहे ते बघून तू शांत राहिला असता काय ? हिंदूंना बाटविणे मिशनरयाना शक्य झाले असते काय ? चौकाचौकात उभे राहून ते आपल्या धर्माला शिव्या देऊ शकले असते काय ? '




७६ . इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स

                   कथा विवेकानंद - ७६ 

     स्वामीजी सर्वधर्मपरिषदेत भाग घेण्यासाठी जलयानाने शिकागोला जात होते . जपान सोडल्यानंतर त्यांचा परिचय श्री . जमशेटजी टाटांशी झाला . दोघेही उगवत्या भारताची स्वप्ने पाहणारे . तार जुळली नाही तर नवलच !
     विश्वदिग्विजय करून, युरोपात तीन वर्षे वेदांताचा प्रसार करून स्वामीजी भारतात परतले . ते परतल्यावर श्री . टाटांनी त्यांना एक पत्र लिहिले. त्या पत्रावर पत्रोत्तर म्हणून स्वामीजींनी ' प्रबुद्ध भारत ' या आपल्या मासिकात ' श्री . टाटा यांची योजना ' या नावाचा लेख लिहिला . 
     त्यांनी लिहिलेय, ' आज शेती व व्यापार या क्षेत्रात आधुनिकता आणली पाहिजे . यात आधुनिक विज्ञानाचा उपयोग केला पाहिजे . आजपर्यंतच्या या सर्वात महान कार्यात टाटाच्या खांद्याला खांदा लावून सर्वांनी उभे राहिले पाहिजे . धनसमर्पण केले पाहिजे . 
     याचा परिपाक म्हणजे आज बंगळूरूला उभी असलेली संस्था ' इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स . ' संपूर्ण आग्नेय आशियात इंजीनियरिंग व औद्योगिक शिक्षण देणारी तसेच संशोधन करणारी प्रमुख संस्था . मोठमोठे अभियंते भारताला याच संस्थेने दिले .  

Wednesday, July 17, 2013

७५ . ती इच्छा माझी आहे .

                    कथा विवेकानंद - ७५

     स्वामी विवेकानंद साधक होते . ते ध्यान धारणा करीत असत . समाधीत अनेक दिवस बसत असत . स्वामी रामकृष्णाकडून निर्विकल्प समाधीचाही लाभ त्यांना मिळाला होता .  
     असेच एक दिवस एकांत समाधीतून ते बाहेर आले . तीन चार दिवसांची ती समाधी होती . समाधीच्या फलश्रुती संदर्भात चर्चा सुरु झाली . भगिनी निवेदितेला ते म्हणाले, ' भारतावर मुसलमानांनी आक्रमक केले . या आक्रमक मुसलमानांनी राज्य केले ते ठीक . पण त्यांनी देवळे का फोडली ? त्या मंदिरातील पवित्र मूर्ती भ्रष्ट का केल्या ? माझ्या मनात या विचाराने नेहमीच संताप यायचा . 
     आज मात्र मला कालीमातेने या प्रश्नाचे उत्तर दिले . माझ्या मनाला शांत केले . मला म्हणाली .  मी माझी मूर्ती आहे तशीच ठेवीन अथवा फोडून घेईन . ती माझी इच्छा आहे . तू कशाला या गोष्टीचा मनस्ताप करून घेतोस ? ती इच्छा माझी आहे . 




                

७४. मन मस्त फकिरी धारी हैं

                     कथा विवेकानंद - ७४

     साधक नरेंद्र भारत भ्रमण करीत होता . ' केल्याने देशाटन पंडित मैत्री . . . ' म्हणतात तसे नवनवे अनुभव घेत होता . मथुरेच्या प्रवासात घडलेला प्रसंग . चालून चालून खूप थकवा आलेला . 
     बाजूला एक माणूस चिलीम घेऊन बसला होता . आपल्याच नादात शांतपणे तो झुरके मारीत होता . स्वामीजी त्याच्याजवळ गेले आणि म्हणाले, ' मला दोनचार झुरके देता काय ? ' 
     तो माणूस दचकला आणि म्हणाला, ' महाराज मी भंगी आहे . '
     त्याचे शब्द ऐकताच स्वामीजी पुढे चालू लागले . चालता चालता ते विचार करू लागले . अरे, मी तर संन्यासी . मला कोठली जातपात ? सगळे मानव मला सारखे . देवासम . आणि मी निघून आलो . केले ते काही बरोबर नाही केले . चला, चूक दुरुस्त करायची . ते माघारी परतले . 
     स्वामीजी पुन्हा त्या माणसाजवळ आले . ' मला थोडा तंबाखू भरा ना ? ' त्यांनी प्रवाश्याला विनंती केली . तो कसाच ऐकेना . स्वामीजी त्याला समजाऊ लागले . शेवटी नरेंद्रच तो, थोडाच त्याला हार जाणार ? चार दोन झुरके हाणून ते चालू लागले . गुणगुणत ' मन मस्त फकिरी धारी हैं , अब एक हि धुन जय जय भारत . . . ' 

Tuesday, July 16, 2013

७३. देवकृपेने मी हिंदू आहे .

                        कथा विवेकानंद - ७३

     स्वामी विवेकानंदांना आपल्या हिंदू धर्माचा फार मोठा अभिमान होता . हिंदू धर्म महान आहेच, त्याचबरोबर यापेक्षा तो मोठा व्हावा, समर्थ व्हावा म्हणून ते प्रयत्न करीत असत . आपल्या शिष्यांना दिशा दाखवीत असत . 
     स्वामीजी असेच एकदा उत्तर हिंदुस्थानांत प्रवास करीत होते . बरोबर भगिनी निवेदिता आणि काही पाश्चात्य शिष्य होते . प्रवास करताना त्यांना एक वृद्ध महिला भेटली . स्वामीजींनी तिला प्रश्न केला, ' आपण कोण ? '          त्या महिलेने उत्तर दिले, ' अल्लाच्या कृपेने मी मुसलमान आहे . ' 
     स्वामीजींना ते उत्तर आवडले . ते आपल्या शिष्यांना म्हणाले, ' बघा, आपल्या धर्माचा अभिमान . याच्या उलट आमचे हिंदू आहेत . रोज देवदेव करणार, व्रतवैकल्ये करणार . पण कधीही तोंडातून निघणार नाही की, देवकृपेने मी हिंदू आहे . ' 

Monday, July 15, 2013

७२ . स्वामीजी साक्षात वादन देवता !

                       कथा विवेकानंद - ७२ 


     स्वामी विवेकानंद गोव्यात आले . मडगावात श्री . सुब्राय नायक यांच्या घरात, सालात त्यांचा मुक्काम होता. स्वामीजींची गायन वादनाची आवड सुब्रायबाबांनी हेरली .   
     पर्वतावर याच काळात लयसूर्याचा  उदय होत होता. खाप्रुमाम पर्वतकर ! वादनातील एक  अनोखा   चमत्कार  ! एका पायाने त्रिताल, दुसऱ्या पायाने झपताल, एका हाताने लय, दुसऱ्या हाताने चौताल

धरून तोंडाने सवारी म्हणत एकाच वेळी समेवर येणारा हा लयभास्कर .      सुब्रायबाबानी खाप्रूमामांना बोलवून आणले. स्वामिजीसमोर त्यांचे वादन झाले. तरुण खाप्रूला वादनासंबंधी सांगताना स्वामीजी म्हणाले, ' लाकडी खोक्याच्या कडेवर बोटांनी वाजवत जसा आपण आवाज काढतो, तसा आवाज चामड्याच्या वरच्या थरातून काढला आला पाहिजे. ' खाप्रूला हे पटेना. त्याला वाटले स्वामीजी आपली थट्टा करतात. हलकेच तसे ते म्हणालेही. 
     स्वामीजी आसनावरून उतरले. बैठक मारून त्यांनी तबल्यावरून  हात फिरविला. त्यांची बोटे तबल्यावरून फिरू लागली. दैवी आवाज सालात घुमू लागला. आपल्या वादनाने उपस्थितांना आ वासायला लावणारा तालवेडा कलावंत खाप्रू . आज त्याचा   वासलेला आ पहाण्याचे  भाग्य सर्वाना मिळाले होते. स्वामीजीच्या वादन कौशल्याने सगळेजण  थक्क झाले होते. खाप्रू मामानी स्वामीजींना साष्टांग नमस्कार घातला. त्यांची क्षमा मागितली. आपल्या  उमेदीच्याउभारीच्या  अत्यंत तरुण वयात स्वामीजीशी साक्षात वादन देवतेशी संबंध येण्याचे भाग्य खाप्रू मामांना लाभले, ते कीर्तिवंत झाले .  



Thursday, July 11, 2013

७१ . मैद्याचे थरचे थर

                      कथा विवेकानंद - ७१ 

     स्वामी विवेकानंद जितके गंभीर होते तितकेच ते विनोदीही होते . विदेश प्रवासात असताना त्यांचा मुक्काम लंडनला होता . तेथील वास्तव्यात एके दिवशी ते शिष्यांसमवेत रहदारी बघत होते . 
     रहदारी बघून परतल्यावर स्वामीजी म्हणाले, पोरींनी आपल्या चेहऱ्यावर पावडरीचे थरच्या थर थापलेले आहेत . थरांची जाडी इतकी आहे कि ते खरवडून काढायला कुदळ आणावी लागेल . 
     स्वामींनी क्षणार्धात कवन रचले . त्याला चाल लावली . आणि गायला लागले . शिष्यांची हसून हसून मुरकुंडी वळली . त्या कवनाचा मतितार्थ होता . ' जेवढ्या म्हणून मुली येताहेत त्यांच्या हातात छत्री आहे . डोक्यावर टोपी आहे . आणि चेहऱ्यावर मैद्याचे थरचे थर आहेत . ' 

Tuesday, July 9, 2013

७०. विवेकानंदांचे गायन

                      कथा विवेकानंद - ७०

     स्वामी रामकृष्णाचे ते शेवटचे आजारपण होते . त्यांना कर्करोग झाला होता . कोलकात्यातील प्रसिद्ध डॉक्टर श्री . महेंद्रलाल सरकार त्यांना तपासायला यायचे . स्वामीजींचे शिष्य त्यांना आराम पडावा म्हणून विविध प्रकारचे यत्न करीत . आपापल्या परीचे प्रयत्न करीत . विवेकानंदांचे गायन हा असाच एक प्रकार रामकृष्णाना आवडणारा असे . 
      डॉक्टर सरकार स्वामीजींना तपासायला आले . विवेकानंद तेव्हा गात होते . स्वामीजीची भावसमाधी लागली होती . डॉक्टरांनी ते दृश्य पहिले . स्वामीजींचे ते समाधी अवस्थेत जाणे त्यांना खटकले . त्यांनी ते बोलूनसुद्धा दाखविले . 
     ठाकूर म्हणाले,  ' कुठे काय ! मी कोठे समाधी अवस्थेत जातो ? ' एवढे म्हणाले आणि पुन्हा मस्तपैकी भावसमाधीत मग्न झाले . विवेकानंदांचे गायन चालूच होते . 






Saturday, July 6, 2013

६९ . तानपुरा जमिनीवर आपटेन !

                    कथा विवेकानंद - ६९ 

     स्वामी विवेकानंद थोर गायक व श्रेष्ठ वादक होते . हा वसा त्यांचे आजोबा दुर्गाप्रसाद व वडील विश्वनाथदत्त यांच्याकडून मिळाला होता . भरदार आवाजाची निसर्गदत्त देणगी त्यांना घराण्याकडून लाभली होती . 
     स्वामी रामकृष्ण आपल्या शिष्यांसह गाणे ऐकायला बसले होते . त्या दैवी आवाजसागरात आता मनसोक्त विहार करायचा . सगळे उत्सुक होते . विवेकानंदांनी तानपुरा जुळवायला सुरुवात केली . पाच मिनिटे झाली दहा  मिनिटे झाली तानपुरा काही जुळेना . 
     शिष्य चुळबुळायला लागले . रामकृष्णही पाचपाच मिनिटांनी त्याला सुरु करायचा आग्रह करायला लागले . पण तो जाम सुरु करेना . आधी तानपुरा जुळणी मगच गायन ! बराच वेळ झाला . सगळेच कंटाळले . विनंत्या, मिनतवाऱ्या कशाचाही परिणाम होईना . शेवटी स्वामी रामकृष्ण परमहंस उठले . 
     शिष्यांना म्हणाले, ' चला, उठा आता ! आजचा दिवस तानपुऱ्याचा, गाणे उद्या होईल . मी आणि थोडा वेळ जर इथे थांबलो ना तर तो तानपुरा निश्चितच जमिनीवर आपटून फोडून टाकीन . ' 




Monday, July 1, 2013

६८ . चमत्कारावर अजिबात विश्वास नाही .

                          कथा विवेकानंद - ६८

     स्वामीजी आले हि बातमी शहरात पसरली . दर्शनाला भक्तांची रांग लागली . एक कलावंतीण आपल्या आईला घेऊन आली . म्हणाली, ' स्वामीजी मी दमेकरी आहे . दम्याच्या त्रासामुळे मी धंदाही करू शकत नाही . मला या आजारातून मुक्त करील असा अंगारा द्या . मी आपली खूप उपकारी होईन . 
     स्वामीजी म्हणाले, " आई, असा अंगारा माझ्याजवळ नाही . मजा म्हणजे मला स्वतःला दम्याचा त्रास आहे . दम्यावर मलाच औषध मिळाले नाहीये , मग तुम्हाला कोठून देऊ ? मला मिळाले कि तुम्हाला पाठवून देईन . '
     स्वामीजींनी पुढे कधीतरी म्हटलेय, ' हिंदू धर्म चमत्कारावर अजिबात विश्वास ठेवीत नाही . धर्माचे आणि चमत्काराचे काहीच देणेघेणे नाही . शहाण्या माणसाने त्यात अजिबात पडू नये . '