Monday, July 22, 2013

८५ . गर्दी माझ्या ध्येयमार्गातील अडचण .

                     कथा विवेकानंद - ८५ 

     लोकमान्य टिळक ही एक संस्था . त्यांचा अनेक संस्थांशी संबंध . अनेकानेक उपक्रमांमध्ये सहभाग . ' डेक्कन क्लब ' ही संस्था दर आठवड्याला एक निबंध वाचनाचा कार्यक्रम ठेवत असे . एकाने निबंध सादर करायचा नंतर मग सर्वांनी त्यावर चर्चा करायची . ' वादे वादे जायते तत्वबोधः '  
     टिळक स्वामीजींना घेऊन हिराबाग येथे या कार्यक्रमाला गेले . श्री . काशिनाथपंत नातू यांनी तत्वज्ञानावर निबंध वाचला . त्यानंतर वेळ चर्चेची . पण कोणी बोलायलाच तयार नाही . विषय थोडा उच्चस्तरीय .  पण सगळेच गप्प गप्प !  
     स्वामीजींना रहावले नाही . त्यांनी बोलायला सुरुवात केली . प्रतिपादित विषयाचे एकेक पदर उलगडीत ते पुढे जाऊ लागले . श्रोत्यांना त्या विषयोदकाने चिंब भिजवून टाकले . फिरत्या संन्याशाची अस्खलित भाषा, वक्तृत्व, प्रतिपादन हातोटी, व्यासंग सगळेच आश्चर्य चकित झाले .      दुसऱ्या दिवशी टिळकांच्या वाड्यात हि गर्दी . नेहमी जेवताना स्वामी व टिळक एकत्र असत . त्या रात्री स्वामीजींनी सांगितले, ' मी उद्याच पुणे सोडणार आहे . ही गर्दी माझ्या ध्येयमार्गातील अडचण आहे . '  दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे टिळक उठले . त्यांना समजले की स्वामीजीनी  भल्या पहाटेच पुणे सोडले आहे . 


No comments:

Post a Comment