Wednesday, July 17, 2013

७४. मन मस्त फकिरी धारी हैं

                     कथा विवेकानंद - ७४

     साधक नरेंद्र भारत भ्रमण करीत होता . ' केल्याने देशाटन पंडित मैत्री . . . ' म्हणतात तसे नवनवे अनुभव घेत होता . मथुरेच्या प्रवासात घडलेला प्रसंग . चालून चालून खूप थकवा आलेला . 
     बाजूला एक माणूस चिलीम घेऊन बसला होता . आपल्याच नादात शांतपणे तो झुरके मारीत होता . स्वामीजी त्याच्याजवळ गेले आणि म्हणाले, ' मला दोनचार झुरके देता काय ? ' 
     तो माणूस दचकला आणि म्हणाला, ' महाराज मी भंगी आहे . '
     त्याचे शब्द ऐकताच स्वामीजी पुढे चालू लागले . चालता चालता ते विचार करू लागले . अरे, मी तर संन्यासी . मला कोठली जातपात ? सगळे मानव मला सारखे . देवासम . आणि मी निघून आलो . केले ते काही बरोबर नाही केले . चला, चूक दुरुस्त करायची . ते माघारी परतले . 
     स्वामीजी पुन्हा त्या माणसाजवळ आले . ' मला थोडा तंबाखू भरा ना ? ' त्यांनी प्रवाश्याला विनंती केली . तो कसाच ऐकेना . स्वामीजी त्याला समजाऊ लागले . शेवटी नरेंद्रच तो, थोडाच त्याला हार जाणार ? चार दोन झुरके हाणून ते चालू लागले . गुणगुणत ' मन मस्त फकिरी धारी हैं , अब एक हि धुन जय जय भारत . . . ' 

No comments:

Post a Comment